कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘मायबाप’ विशेषांकाचे विमोचन

बातमी शेअर करा...

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात ‘मायबाप’ विशेषांकाचे विमोचन

जळगाव: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळेत साहित्य सृजन उपक्रमांतर्गत ‘मायबाप’ या विशेषांकाच्या भित्तिपत्रिकेचे विमोचन करण्यात आले. बिजलाई पगारे यांच्या हस्ते हे विमोचन झाले असून, यावेळी भाषा प्रशाळेचे संचालक प्रा. डॉ. म. सु. पगारे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

आई-वडिलांचे महत्त्व कायम

यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की, आधुनिक काळात कुटुंब आणि समाजाची व्याख्या बदलत असली तरी आई-वडिलांचे महत्त्व कधीच कमी होत नाही. यशाच्या कितीही शिखरांवर पोहोचलो तरी आई-वडिलांचे संस्कार विसरू नयेत, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. ‘मायबाप’ या विशेषांकातून विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

कवितांचे विविध भाषांत सादरीकरण

या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी विविध भाषेतील कवितांचे वाचन केले. चेतन शिंदेने वा. ना. आंधळे यांची ‘आई’ ही कविता सादर केली, तर हर्षदा महाजन हिने आईवर आधारित ओव्या सादर केल्या. संशोधक विद्यार्थी खेमराज पाटील यांनी ‘प्रज्ञास्पंदनेचे सौंदर्यशास्त्र’ या पुस्तकातील ‘बाप’ ही अर्पण पत्रिका वाचली, ज्याचा हिंदी अनुवाद प्रवीण गावितने सादर केला. ‘बा तथागता’ या विशाल काव्याची मराठी अर्पण पत्रिका स्वप्निल जाधव, हिंदी अनुवाद स्नेहा गायकवाड, इंग्रजी अनुवाद तेजस्विनी सुर्वे आणि अहिराणी अनुवाद भाग्यश्री लाखे यांनी सादर केला. या व्यतिरिक्त, प्रांजली जोशीने ‘डिगिंग’ ही इंग्रजी कविता तर गायत्री वाळवीने रवींद्रनाथ टागोर यांची ‘याद आना’ ही कविता सादर केली.

यावेळी विद्यापीठातील विविध प्रशाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम