
“कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रम”
“कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात वृक्षदिंडी व वृक्षारोपण उपक्रम”
जळगाव (प्रतिनिधी) दि. १ : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील आंतरविद्याशाखीय अभ्यास प्रशाळेच्या शिक्षण शास्त्र विभागातर्फे पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने “वृक्षदिंडी आणि वृक्षारोपण” हा उपक्रम नुकताच नूतन मराठा शिक्षण शास्त्र विद्यालयाच्या प्रांगणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रेम जागवून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मार्गदर्शन करताना प्रशाळेच्या संचालक डॉ. मनीषा इंदाणी यांनी वृक्षसंवर्धन ही आजची काळाची गरज असल्याचे सांगितले. दरवर्षी वृक्षदिन साजरा करून शैक्षणिक संस्था, समाजसंस्था आणि विविध विभाग वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन उपक्रम राबवितात. या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कृतीतून सहभागी करून घेणे हा उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. एस. डी. सोनवणे यांनी झाडे हे माणसाच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग असल्याचे अधोरेखित केले. शहरीकरण, औद्योगिकीकरण आणि प्रदूषणामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला असून, अशा उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारीची जाणीव व वृक्षप्रेम दृढ व्हावे हीच खरी प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रा. वाय. एस. नन्नवरे, प्रा. आर. एस. पाटील, डॉ. एस. बी. पाटील, प्रा. एस. के. पाटील, प्रा. पी. आय. परदेशी, प्रा. एम. पी. भदाणे, डॉ. स्वाती तायडे, डॉ. रणजित पारधे, श्री. संदीप वाघ आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम. एड. विद्यार्थिनी ललिता देसाई यांनी केले. सूत्रसंचालन गंगा चौधरी हिने केले, तर आभारप्रदर्शन जागृती भामरे हिने केले. एम. एड. द्वितीय वर्षातील सर्व विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहकार्य केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम