कानळदा भोकर देवगाव परिसरात बिबट्याच्या वावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी

बातमी शेअर करा...

कानळदा भोकर देवगाव परिसरात बिबट्याच्या वावर तात्काळ उपाययोजना करण्यात यावी

शिवसेना ठाकरे गटाची  निवेदनाद्वारे मागणी

जळगाव,: जळगाव तालुक्यातील देवगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून काल (४ ऑगस्ट) शेतात काम करत असलेल्या इंदुबाई वसंत पाटील या शेतकरी महिलेला बिबट्याने ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. बिबट्याच्या वाढत्या उपद्रवामुळे स्थानिक जनतेमध्ये अस्वस्थता पसरली असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने तात्काळ उपाययोजनांची मागणी करण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर जळगाव ग्रामीणचे उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सुकदेव सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वनविभागास निवेदन दिलं. यामध्ये पीडित कुटुंबाला २५ लाख रुपयांची आर्थिक मदत तातडीने जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बिबट्याचा बंदोबस्त करून पिंजऱ्याच्या साहाय्याने जेरबंद करण्याची आणि संपूर्ण परिसरात पेटे लावून गस्त वाढवण्याची विनंती केली आहे.

“बिबट्याचा वावर सातत्याने वाढत असून तो आता नरभक्षक बनत आहे. त्यामुळे कोणतीही पुढील जीवितहानी टाळण्यासाठी वनविभागाने त्वरीत कारवाई करावी,” अशी मागणी प्रा. सोनवणे यांनी केली.

निवेदन देताना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रा. भाऊसाहेब सोनवणे, अशोक आप्पा सोनवणे, तालुका अध्यक्ष प्रमोद घुगे, भीमराव पांडव, हिरालाल सोनवणे, सरपंच नंदलाल सोनवणे, विजय लोहार, सचिन चौधरी, प्रभाकर कोळी, किरण ठाकूर यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

स्थानिक प्रशासनाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेतली असून वनविभागाकडून तपास व पिंजरा लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम