
कॅन्सरमुक्त जळगावसाठी कृषी विभाग आणि शेतकऱ्यांचा पुढाकार
रासायनिक खतांच्या योग्य वापरासाठी शेतकऱ्यांनी साथ देण्याचे आवाहन
जळगाव : रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापरामध्ये जळगाव जिल्हा देशात आघाडीवर आहे. या अवाजवी वापरामुळे जमिनीची सुपीकता तर कमी होत आहेच, पण सोबतच कॅन्सरचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे थांबवण्यासाठी आता कृषी विभाग, शेतकरी कृती समिती आणि कृषी दुकानदार संघटना (माफदा) यांनी एकत्रित येऊन एक मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेअंतर्गत, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा कृषी अधिकारी कुरबान तडवी आणि जिल्हा कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी कृषी विद्यापीठांनी शिफारस केलेल्या विविध पिकांनुसार खतांच्या योग्य मात्रांचे तक्ते तयार केले आहेत. जळगाव जिल्हा कृषी दुकानदार संघटनेच्या विनोद तराळ आणि कैलास मालू यांनी हे तक्ते बॅनरच्या स्वरूपात तयार करून प्रत्येक कृषी केंद्रात लावण्याचा आग्रह धरला आहे.
या उपक्रमाबद्दल बोलताना तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे म्हणाले, “कृषी विभागाने शिफारस केल्यानुसार शेतकऱ्यांनी शक्य असल्यास जमिनीची तपासणी करून खतांचा वापर केल्यास खर्च तर वाचेलच, पण सोबतच जमीन आणि आपल्या सर्वांचे आरोग्य सुधारेल.”
शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील यांनी या प्रयत्नांचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले की, लवकरच कीटकनाशकांसाठी देखील असेच तक्ते तयार केले जातील आणि ‘कॅन्सरमुक्त जळगाव’ अभियानात जिल्ह्यातील सर्व दुकानदार योगदान देतील अशी आशा आहे.
चोपडा तालुका कृषी दुकानदार संघटनेचे डोंगर पाटील यांनी सांगितले की, लवकरच प्रत्येक दुकानात हे तक्ते पाठवले जातील. तसेच, शेतकऱ्यांनी बनावट खते आणि कीटकनाशकांपासून सावध राहावे, अधिकृत डीलर्सकडूनच खरेदी करावी जेणेकरून फसवणूक टाळता येईल. अनेक शेतकरी अंकलेश्वर येथून थेट कीटकनाशके आणतात आणि त्यात फसवले गेल्याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत, असेही त्यांनी सांगितले.
या बैठकीला कृषी अधिकारी दीपक साळुंखे, आर. एम. पाटील, आर. आर. चौधरी, शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, अँड. हेमचंद्र पाटील, कुलदीप राजपूत, अजित पाटील, प्रशांत पाटील, नीलेश पाटील, कृषी केंद्रांचे संचालक डोंगर पाटील, प्रदीप अग्रवाल, नितीन चौधरी, अनिल पाटील, मनोज अग्रवाल, दीपक जैस्वाल, कल्याण पाटील, आणि सतीश पाटील उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम