
कॅन्सर रुग्णालय व औषधांचे दर कमी करणे स्वागतार्ह, पण आजार होण्याची कारणेही दूर करावीत
कॅन्सर रुग्णालय व औषधांचे दर कमी करणे स्वागतार्ह, पण आजार होण्याची कारणेही दूर करावीत
एस. बी. पाटील यांचे मोदींना आवाहन
जळगाव (प्रतिनिधी) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक जिल्ह्यात कॅन्सर रुग्णालय सुरू करणे आणि कॅन्सरवरील औषधांचे दर कमी करण्याची घोषणा केली आहे, त्याचे स्वागतच आहे. मात्र, भारतात झपाट्याने वाढत असलेले हृदयरोग, कॅन्सर, ऑटो-इम्यून आजार आणि नपुसकतेसारख्या समस्यांची कारणेही तितकीच गंभीर आहेत. त्यामुळे फक्त उपचारांवर भर न देता, या आजारांची मूळ कारणे नष्ट करण्यासाठी ठोस पावले उचलावीत, असे आवाहन शेतकरी कृती समितीचे समन्वयक एस. बी. पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.
२७ कीटकनाशकांवर बंदीची मागणी अद्याप प्रलंबित
एस. बी. पाटील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, २०१५ पासून भारतातील वेगवेगळ्या समित्यांनी २७ घातक कीटकनाशकांवर बंदी घालण्याची शिफारस केली होती. मात्र, कीटकनाशक कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती घेत वेगवेगळ्या समित्या नेमण्याचा प्रयत्न केला. अखेर, २०२३ मध्ये सरकारने नवीन समिती स्थापन करून फक्त ३ कीटकनाशकांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला, तर उर्वरित २४ अजूनही बाजारात उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत, अशी चिंता पाटील यांनी व्यक्त केली आहे.
तेलबियांच्या गडबडीमुळे हृदयरोगांचा धोका वाढतोय!
देशात तेलबियांचे भाव पाडण्यासाठी सरकारने ठरवलेल्या प्रमाणापेक्षा अधिक प्रमाणात पाम तेलाची भेसळ केली जात आहे. त्यामुळे भारतात हृदयरोग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हे मुद्दे लक्षात घेऊन सरकारने पाम तेलाच्या वापराबाबत कठोर धोरण राबवावे, अशी मागणी पत्रात केली आहे.
दुधातील भेसळीमुळे नवीन पिढीवर गंभीर परिणाम
सध्या देशात सर्वाधिक भेसळ दुधामध्ये होत आहे. परिणामी, नवीन पिढीमध्ये नपुसंकतेची समस्या वाढत आहे, काही मुले लहान वयातच प्रौढत्वाच्या टप्प्यावर पोहोचत आहेत. ही परिस्थिती विशेषतः शाकाहारी लोकांसाठी अधिक घातक ठरत असून, हिंदू धर्मीय नागरिकांवर त्याचा जास्त परिणाम होत असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
भारत हा आजारी लोकांचा देश होणार?
या सर्व गोष्टी नियंत्रित न केल्यास भारत हा आजारी लोकांचा देश बनेल, अशी भीती एस. बी. पाटील यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सहृदयी आहेत, मात्र त्यांच्या व्यस्त वेळापत्रकामुळे या गंभीर बाबी त्यांच्या निदर्शनास येऊ शकत नाहीत. त्यामुळे हे मुद्दे त्यांच्या निदर्शनास आणण्यासाठी थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयात पत्रावर कार्यवाही सुरू
एस. बी. पाटील यांनी सादर केलेल्या पत्रावर केंद्र सरकारच्या ‘भारत सरकार संचालक’ या पदावर कार्यरत अनिल फुलवारी यांनी कार्यवाही सुरू केली असून, लवकरच यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली आहे.
देशातील गंभीर आरोग्य समस्यांवर लक्ष केंद्रित करून केवळ उपचार नव्हे, तर त्यांची कारणेही नष्ट करण्यासाठी सरकारने त्वरित पावले उचलावीत, अशी मागणी शेतकरी कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम