
केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘अंतरंग २के२५’ स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
केसीई इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘अंतरंग २के२५’ स्नेहसंमेलन उत्साहात साजरे
विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग
जळगाव – खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात ‘अंतरंग २के२५’ स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे संचालक डॉ. शिल्पा बेंडाळे, कोषाध्यक्ष श्री. डी. टी. पाटील, संचालक श्री. शशिकांत वडोदकर, प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, अकॅडमिक डीन डॉ. सी. एस. पाटील, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डीन प्रा. गणेश पाटील, आयक्यूएसी समन्वयक प्रा. कल्पेश महाजन तसेच विविध विभागांचे प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन आणि सरस्वती पूजनाने झाली. यावेळी प्राचार्य डॉ. संजय सुगंधी यांनी स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम व्यासपीठ असल्याचे सांगितले. प्रमुख पाहुणे डॉ. शिल्पा बेंडाळे यांनी महाविद्यालयातील उपलब्ध सुविधा, योगाचे महत्त्व, महत्वाकांक्षा आणि प्रेरणा याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात ‘अंतरंग’ स्मरणिकेचे तसेच ‘आयजेआरडी’ संशोधन पत्रिकेचे आणि ‘कार्यक्षम’ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. या स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण खान्देशी रील स्टार आणि गायक अशोक पाटील व सोनाली जाधव होते. त्यांनी ‘आझाद केलंय पाखरा’ आणि अन्य अहिराणी गाण्यांवर विद्यार्थ्यांना थिरकवले.
विद्यार्थ्यांसाठी ट्रॅडिशनल डे, ग्रुप डे, फिल्मी डे, साडी व टाय डे, बॉलिवूड थीम, हॉरर डे, बॅक टू स्कूल डे यांसारखे विविध थीम डे आयोजित करण्यात आले. सोलो सॉंग, सोलो डान्स, ग्रुप डान्स, ड्रामा, रॅम्प वॉक फॅशन शो, क्रिकेट, रांगोळी, मेहंदी अशा विविध स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
विशेष आकर्षण असलेल्या फॅशन शोसाठी परीक्षक म्हणून मेकअप आर्टिस्ट अर्चना जाधव उपस्थित होत्या. त्यांनी विजेत्यांना पारितोषिके प्रदान केली. तसेच, अंतिम परीक्षेत व ‘अविष्कार’ स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयुषी ओचानी, सिद्धी शिंपी, पूर्वा पाटील आणि यज्ञेश बारी यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. हर्षा देशमुख यांनी व्यक्त केले. सांस्कृतिक कार्यक्रमाचे विद्यार्थी प्रतिनिधी निखिल पाटील आणि श्वेता चौधरी होते. विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून नेहा पोळ उपस्थित होत्या. संपूर्ण स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. सचिन नाथ होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम