
खंडव्यात तरुणीने दोन तरुणांना हनीट्रॅपमध्ये फसवले; ३ कोटींची लूट
खंडव्यात तरुणीने दोन तरुणांना हनीट्रॅपमध्ये फसवले; ३ कोटींची लूट
खंडवा ;- मध्य प्रदेशातील खंडवा येथे एका तरुणीने हनीट्रॅपच्या माध्यमातून दोन तरुणांना फसवून त्यांच्याकडून तब्बल ३ कोटी रुपये लुटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. निखत हाश्मी असे या तरुणीचे नाव असून, तिने बनावट ओळखीचा वापर करत खंडव्यातील एहतेशाम खान आणि कोलकात्यातील एका ज्वेलरी व्यावसायिकाला आपल्या जाळ्यात अडकवले. या प्रकरणी मोघट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून, पोलिसांनी फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून संशयित तरुणीचा शोध सुरू केला आहे.
खंडव्यात राहणाऱ्या एहतेशाम खान यांनी मोघट पोलीस ठाण्यात निखत हाश्मीविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चार वर्षांपूर्वी एका मित्राच्या माध्यमातून निखतशी त्यांची ओळख झाली. निखत इंदूरमध्ये भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये राहत होती. तिने एहतेशाम यांना हनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवत मैत्री केली आणि नंतर त्यांच्याशी लग्न केले. लग्नानंतर निखत केवळ १७ दिवस त्यांच्या घरी राहिली. यादरम्यान तिने भावनिक आणि पोलिसी कारवाईच्या धमक्या देऊन त्यांच्याकडून वारंवार पैसे उकळले. तिने आईच्या उपचार आणि भावंडांच्या शिक्षणाच्या नावाखाली २२ लाख रुपये घेतले. त्यानंतर १८व्या दिवशी ती ५ लाखांचे दागिने आणि २.५ लाख रुपये रोख घेऊन घरातून फरार झाली.
एहतेशाम यांनी तक्रारीत आणखी एक गंभीर खुलासा केला की, निखतने कोलकात्यातील एका ज्वेलरी व्यावसायिकाचीही फसवणूक केली आहे. तिने स्वतःला उर्वशी अग्रवाल म्हणवत बनावट ओळखपत्रांचा वापर करून या व्यावसायिकाशी मैत्री केली आणि नंतर त्याच्याशी नरगिस या नावाने लग्न केले. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर तिने या व्यावसायिकाकडून २ ते ३ कोटी रुपये लुटले आणि कोलकात्यातून गायब झाली. निखतकडे बनावट आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्र असल्याचेही समोर आले आहे.
एहतेशाम खान यांच्या तक्रारीनंतर खंडवा शहराचे एसपी अभिनव बरंगे यांनी सांगितले की, निखत हाश्मीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलकात्यातील व्यावसायिकानेही आपली फसवणूक झाल्याचा जबाब नोंदवला आहे, ज्यामध्ये त्याने २ ते ३ कोटींच्या नुकसानाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी निखतचा शोध सुरू केला असून, तिला लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान निखतच्या इतर संभाव्य गुन्ह्यांचाही छडा लावला जाणार आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम