
खत विक्रीत गडबड झाल्यास कारवाई ; जिल्ह्यात तपासणी मोहिमेस वेग
खत विक्रीत गडबड झाल्यास कारवाई ; जिल्ह्यात तपासणी मोहिमेस वेग
जळगाव,(प्रतिनिधी) – राज्यातील काही भागांमध्ये कृत्रिम खत टंचाई निर्माण केल्याचे निदर्शनास आल्याच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातही कृषी विभागाने खत विक्री आणि साठ्याची विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. विक्री आणि प्रत्यक्ष साठ्यात तफावत आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
जामनेर व धरणगाव तालुक्यांत १०० टक्के तपासणी पूर्ण
आतापर्यंत जामनेर आणि धरणगाव तालुक्यातील सर्व खत विक्रेत्यांची १०० टक्के तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान अनेक ठिकाणी पीओएस (POS) मशीनचा वापर न करता प्रलंबित खत विक्री झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे पीओएस यंत्रावर दर्शविलेला साठा आणि प्रत्यक्ष साठ्यात मोठी तफावत आढळली आहे.
विक्रेत्यांकडून खुलासे मागवले
तफावत आढळून आलेल्या विक्रेत्यांकडून कृषी विभागाने खुलासे मागवले आहेत. मात्र यानंतरही साठ्यातील विसंगती दूर न झाल्यास संबंधितांवर कारवाई अनिवार्य करण्यात येणार आहे, असा इशारा कृषी विभागाने दिला आहे.
‘नो आधार, नो सेल’ धोरणाचे काटेकोर पालन आवश्यक
२०१७ पासून अनुदानित खत विक्रीसाठी आधार लिंक केलेल्या पीओएस मशीनचा वापर बंधनकारक आहे. मात्र, अनेक विक्रेत्यांकडून याची सर्रास पायमल्ली होत असून, त्यामुळे खतांचा खरेदी-विक्री व्यवहार अपारदर्शक बनत आहे. यावर उपाय म्हणून आता ‘नो आधार, नो सेल’ धोरणाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना कृषी विभागाने विक्रेत्यांना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांसाठी सूचना
शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना आपले आधारकार्ड सोबत ठेवणे अनिवार्य आहे. तसेच, कोणत्याही परिस्थितीत पीओएस मशीनविना खताची विक्री स्वीकारू नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
“साठा, विक्री, इन्व्हॉइस रेकॉर्ड व आधार डिव्हाईस यांची तपासणी सुरु आहे. कुठेही तफावत आढळल्यास कारवाई निश्चितच केली जाईल.”
– पद्मनाभ म्हस्के, कृषी विकास अधिकारी

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम