
खरा विकास तोच, जो समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो -प्रा. प्रकाश पाठक
खरा विकास तोच, जो समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो -प्रा. प्रकाश पाठक
जळगाव (प्रतिनिधी) खरा विकास तोच, जो समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचतो. शासनाच्या योजना, समाजकार्य आणि शिक्षण यांचे ध्येय ‘अंत्योदय’ या भावनेने प्रेरित असले पाहिजे असे प्रतिपादन प्रा. प्रकाश पाठक यांनी केले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय अध्यासनातर्फे “एकात्म मानव दर्शन – संकल्पना आणि प्रासंगिकता” या विषयावर एक दिवशीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन दि. १५ ऑक्टोबर रोजी विद्यापीठातील सामाजिक शास्त्र प्रशाळेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरू प्रा. एस टी इंगळे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. पवित्रा पाटील, अध्यासनाचे विभागप्रमुख पी. पी. माहुलीकर आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना प्रा. पाठक म्हणाले की, व्यक्ती, कुटुंब, समाज मग राष्ट्र आणि निसर्ग असा विचार पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मांडला. त्यांनी मांडलेला एकात्म मानव दर्शन हे केवळ तत्वज्ञान नाही तर भारताच्या सामाजिक जीवनाचा आत्मा आहे. संस्कार, सर्वसमावेशक, वैचारिक, राष्ट्र निर्मितीसाठी, चारित्र्यसंपन्न, मूल्याधिष्ठित समाजनिर्मिती करणे हीच आपल्या खऱ्या प्रगतीची दिशा आहे. येत्या १५ ते २० वर्षात जगाला आपल्या या विचारधारेची गरज पडणार असल्याचे देखील ते यावेळी म्हणाले. समाजाचा आणि समाजातील सर्व लहान मोठ्या घटकांचा विकास झाला पाहिजे असे सांगत त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जीवनातील प्रेरणादायी घडामोडींची माहिती उपस्थितांना दिली.
अध्यक्षीय भाषणात कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांनी सांगितले की, मानव कल्याणाचा व्यापक दृष्टिकोन असलेला विचार म्हणजे एकात्म मानव दर्शन असे सांगत त्यांनी पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या विचारांवर प्रकाश टाकला.पंडितजींनी आपल्या चार भाषणातून एकात्म मानव दर्शनाचा विचार मांडला या विचारांची देशाला गरज आहे. त्यामुळे आज हा कार्यक्रम आयोजित केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पंडित दीन दयाल उपाध्याय यांच्या विचारांच्या एकात्म मानव दर्शन, एकात्म पालकत्व असे दोन क्रेडिट असेलेले कोर्स सुरू केले असून ते लवकरच उपलब्ध होणार आहेत. दीनदयाला उपाध्याय रोजगार मेळाव्याचे विद्यापीठात आयोजन करण्यात येत असून पंडितजी आणि त्यांच्यावर काम करणाऱ्या ई पत्रिका तयार करणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यासनाचे विभागप्रमुख प्रा. पी पी माहुलीकर यांनी केले. यात एकात्म मानव दर्शन हीरक महोत्सव साजरा करण्याचा उदेश सांगत त्यांच्या एकूण जीवन चरित्राचा आढावा घेतला. पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या शिक्षण, पत्रकारिता त्यांनी लिहिलेली पुस्तके माहिती देत विभागामार्फत आयोजित कार्यक्रमाचा आढावा घेतला.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अंबाजोगाई येथील डॉ. वसंत देशमुख यांचे “आर्थिक विकासात वंचितांचा सहभाग – एकात्म मानव दर्शन आणि अंत्योदय”, यवतमाळ येथील डॉ. नितीन खर्चे यांचे “एकात्म मानव दर्शन : पंच परिवर्तन”तर मुंबई येथील डॉ. रविकांत सांगुर्डे यांचे “एकात्म मानव दर्शन – उपयोगिता” या विषयांवर विशेष व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले.
अधिष्ठाता प्रा. जगदीश पाटील, अधिसभा सदस्य केदारनाथ कवडीवाले, स्वप्नाली काळे, वैशाली वऱ्हाडे, प्रा. अजय पाटील, डॉ. ऋषिकेश चित्तम, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक प्रा. जयेंद्र लेकुरवाळे, व्यवस्थापन प्रशाळेच्या संचालिका प्रा. मधुलिका सोनवणे यांच्यासह विद्यापीठातील विविध प्रशाळेतील शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वर्षा पालखे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. तुषार रायसिंग यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम