
खानदेश नाट्य प्रतिष्ठानचा कौटुंबिक सोहळा उत्साहात संपन्न
खानदेश नाट्य प्रतिष्ठानचा कौटुंबिक सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव : गुरुपौर्णिमेनिमित्त खानदेश नाट्य प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कौटुंबिक सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या सोहळ्यात जुन्या व नव्या मिळून तब्बल ७० कलावंत एकत्र आले होते. अनेक वर्षांनी पुन्हा भेटलेल्या कलाकारांनी गळाभेट घेत आपले रंगमंचावरील आठवणींना उजाळा दिला.
या समारंभात प्रतिष्ठानच्या स्थापनेपासून कार्यात योगदान दिलेल्या जेष्ठ रंगकर्मींचा सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नाट्य समिक्षक प्रा. राजेंद्र देशमुख, जय भवानी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष भानुदास पाटील, सचिव बाळकृष्ण पाटील, सहसचिव रविराज पगार आणि महाजन सर यांच्या उपस्थितीत मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या वेळी श्री. उत्तमराव नेरकर, प्रमोद बाविस्कर, सुनंदा गवळी, अरुण सानप, संतोष पाटील, रविंद्र साळी, सोमनाथ सानप, अविनाश चव्हाण, योगेश शुक्ल, शाम जगताप, संजय निकुंभ, दुष्यंत जोशी, पियुषभाई रावळ, सोनल कपोते, चंद्रकांत चौधरी, मिलिंद देशमुख, अरुण साळुंखे, ओमप्रकाश शर्मा आणि रवी पाटील या गुरुतुल्य रंगकर्मींचा गौरव करण्यात आला.
या प्रसंगी सत्कार्थी योगेश शुक्ल यांनी प्रतिष्ठानच्या गौरवशाली इतिहासाचा आणि आठवणींचा भावनिक आढावा घेतला. प्रमुख पाहुणे रविराज पगार यांनी जय भवानी शिक्षण मंडळाच्या शिक्षण क्षेत्रातील योगदानाबरोबरच रंगकर्मींनी केलेल्या कार्याची माहिती दिली. “एका विचाराचे पाच लोक एकत्र आले तर काय घडू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” असे ते म्हणाले.
प्रा. राजेंद्र देशमुख म्हणाले, “नाट्य वेडा माणूस साधा असतो पण असामान्य कार्य करण्याची धमक त्याच्यात असते. कारण नाटक ही समाजमनाला जागवणारी आणि समृद्ध करणारी कला आहे.”
या कार्यक्रमात पुढील वर्षी, म्हणजेच २०२६ मध्ये खानदेश नाट्य प्रतिष्ठानच्या सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्त आयोजित होणाऱ्या गौरव समारंभाची माहितीही देण्यात आली. श्री. चिंतामण पाटील यांच्या सन्मानार्थ १६ सप्टेंबर २०२५ रोजी विशेष सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती शरद भालेराव यांनी दिली. त्यानिमित्ताने प्रकाशित होणाऱ्या स्मरणिकेसाठी १ ऑगस्टपूर्वी आपले लेख श्री. योगेश शुक्ल यांच्याकडे सुपूर्त करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश सोनार, प्रदीप जाधव व कु. एकता आसोदेकर यांनी विशेष मेहनत घेतली. समारोपप्रसंगी अरुण सानप यांनी आभारप्रदर्शन केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम