
खासदार इकरा हसन यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : योगेंद्र राणा यांच्यावर कारवाईची एकता संघटनेची मागणी
खासदार इकरा हसन यांच्याविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरण : योगेंद्र राणा यांच्यावर कारवाईची एकता संघटनेची मागणी
जळगाव : करणी सेनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्र राणा यांनी लोकसभा खासदार इकरा हसन यांच्याविरोधात केलेल्या अश्लील व महिलाविरोधी टिप्पणीचा तीव्र निषेध करत एकता संघटनेच्या वतीने त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी एक निवेदन अतिरिक्त दंडाधिकारी व आरडीसी जयश्री माळी यांच्यामार्फत राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, राष्ट्रीय महिला आयोग व मानवाधिकार आयोगाकडे पाठवण्यात आले.
एकता संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, योगेंद्र राणा यांचे वक्तव्य केवळ खासदार इकरा हसन यांचा नाही तर लोकशाही, महिलांचा सन्मान आणि सार्वजनिक जीवनातील स्त्री सहभागाचा अवमान आहे. समाजात अशा वक्तव्यांमुळे महिला द्वेष व असहिष्णुता वाढते, असे स्पष्ट करण्यात आले.
फोटो पायदळी तुडवून निषेध
निवेदन सादर केल्यानंतर महिला प्रतिनिधींनी योगेंद्र राणा यांचा छायाचित्रावर पायदळी तुडवत आणि त्यावर थुंकत तीव्र निषेध व्यक्त केला. यामध्ये नाजिया एजाज, शबीना हरीश, रुबीना अख्तर, सकीना इस्माईल, यास्मिन अमरुल्ला, रुबीना इक्बाल, शकीला शहाबुद्दीन आणि शाहीन फारूख शेख यांनी सहभाग घेतला.
जनआंदोलनाचा इशारा
एकता संघटनेचे समन्वयक फारुख शेख यांनी सांगितले की, जर योगेंद्र राणा यांच्यावर तात्काळ कारवाई झाली नाही, तर संघटना जनआंदोलन छेडेल. या निषेधात मुफ्ती खालिद, फारूख शेख, हाफिज रहीम पटेल, मतीन पटेल, अनीस शाह, नदीम मलिक, अन्वर खान, युसूफ खान, आरिफ देशमुख, नजमुद्दीन शेख, इम्रान शेख, सईद शेख, कासिम शेख, अरबाज पठाण पालधी आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम