
खुनाचा मुख्य आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
खुनाचा मुख्य आरोपी अवघ्या काही तासांत जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): कासमवाडी (जळगाव) येथे ३ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडलेल्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यातील (सीसीटीएनएस गु.क्र. ७०६/२०२५, भा.दं.वि. कलम ३०२) मुख्य संशयिताला स्थानिक गुन्हे शाखेच्या (स्थागुशा) पथकाने अवघ्या काही तासांतच शिताफीने अटक केली आहे. या वेगवान कारवाईमुळे जिल्हा पोलीस दलाच्या तपास यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
खुनाची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी तात्काळ गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना दिले. त्यानुसार गायकवाड यांनी पोह. नितीन बाविस्कर, पोना. किशोर पाटील, पोर्क. छगन तायडे, पोकों. रविंद्र कापडणे यांच्यासह विशेष पथक तयार करून संशयिताचा शोध सुरू केला.
स्थागुशा पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे नशिराबाद परिसरात सापळा रचला. या कारवाईत खुनातील मुख्य आरोपी योगेश संतोष पाटील उर्फ पिंटू (वय २७, रा. कासमवाडी, जळगाव) याला यशस्वीपणे ताब्यात घेण्यात आले. त्याला पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईसाठी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे पार पडली. या तत्पर कारवाईमुळे परिसरात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, गुन्हेगारांविरुद्ध कठोर कारवाईचा संदेश गेला आहे. तपास अद्याप सुरू असून, इतर संशयितांचा शोध घेतला जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम