
गंगातीरी स्वामीजींच्या प्रेरणादायी संदेशातून मासिक पाळीविषयी जनजागृती
गंगातीरी स्वामीजींच्या प्रेरणादायी संदेशातून मासिक पाळीविषयी जनजागृती
ऋषिकेश | प्रतिनिधी : २८ मे – जागतिक मासिक पाळी दिन या औचित्याने ऋषिकेश येथील पवित्र गंगा नदीच्या तीरावर एक विलक्षण आणि प्रेरणादायी अनुभव घडला. परमार्थ गुरुकुल आश्रमात आयोजित कार्यक्रमात, स्वामी चिदानंद सरस्वतीजी महाराज यांनी मासिक पाळीसारख्या महत्त्वाच्या सामाजिक विषयावर उपस्थितांना संबोधित करताना स्पष्टपणे सांगितले की, “मासिक पाळी ही कोणतीही लाज वाटावी अशी गोष्ट नसून, ती एक नैसर्गिक आणि गौरवाची प्रक्रिया आहे.”
या वेळी आयोजित केलेली मासिक पाळी विषयक माहितीपट (डॉक्युमेंटरी) आणि स्वामीजींचे विचार हे उपस्थितांसाठी एक अंतर्मुख करणारा अनुभव ठरले. समाजातील दांभिकतेवर प्रहार करत, स्वामीजींनी स्त्रियांना आत्मसन्मान आणि स्वाभिमानाने जगण्याचा संदेश दिला.
या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निधी फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली सूर्यकांत विसपुते यांनी सांगितले की, “ही घटना आमच्या धार्मिक सहलीचा एक अविस्मरणीय भाग ठरली आहे. नैनिताल, नीम करोली बाबा आणि कैचीधाम या ठिकाणी घेतलेल्या आध्यात्मिक अनुभवाला गंगातीरी मिळालेला हा सामाजिक संदेश जोडला गेला आणि त्याने या सहलीला एक वेगळीच दिशा दिली.”
वैशालीताईंनी यावेळी सांगितले की, “मासिक पाळीविषयी समाजात अजूनही भीती, लाज आणि गैरसमज आहेत. हे बदलण्यासाठी केवळ महिलांनी नव्हे, तर संपूर्ण समाजाने पुढाकार घेतला पाहिजे. निधी फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हा विषय प्रत्येक गाव, प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी कार्यरत आहोत.*”
स्वामीजींच्या प्रेरणेतून मिळालेली नवी दिशा आणि गंगातीरी जागवलेली सामाजिक जाणीव यामुळे हा मासिक पाळी दिन केवळ एक दिवसापुरता मर्यादित राहिला नाही, तर तो एक चळवळीचा आरंभ ठरला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम