
गणेशोत्सवानंतर जि.प. आरक्षण सोडत; दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल
गणेशोत्सवानंतर जि.प. आरक्षण सोडत; दिवाळीनंतर निवडणुकांचा बिगुल
जळगाव: जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. निवडणूक आयोगाने गट आणि गण रचनेला अंतिम मान्यता दिल्यानंतर आता सर्वांचे लक्ष आरक्षणाच्या सोडतीकडे लागले आहे. गणेशोत्सव संपल्यानंतर ही आरक्षण सोडत काढली जाईल, असा अंदाज असून, दिवाळीनंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.
अंतिम गट आणि गण रचना जाहीर
जिल्हा परिषदेची गट आणि गण रचना १४ जुलै रोजी जाहीर करण्यात आली होती. त्यावर १२१ हरकती दाखल झाल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी घेतल्यानंतर प्रशासनाने २२ ऑगस्ट रोजी ६८ गट आणि १३६ गणांची अंतिम रचना जाहीर केली.
शासनाने आरक्षणासाठी जाहीर केलेल्या नव्या नियमावलीमुळे अनेक माजी सदस्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. नव्या नियमावलीनुसार आरक्षण कसे निघेल याचे आडाखे बांधले जात आहेत, ज्यामुळे अनेक जुन्या सदस्यांना पुन्हा निवडणूक लढवण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे.
या सर्व घडामोडी पाहता, गणेशोत्सव संपल्यानंतर आरक्षण सोडत निघेल आणि त्यानंतर साधारण एक महिन्याचा कालावधी निवडणुकांच्या तयारीसाठी लागेल. त्यामुळे दिवाळीच्या आसपास निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे, ज्यामुळे इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम