गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन : आमदार किशोरआप्पा पाटील यांचे मार्गदर्शन

बातमी शेअर करा...

गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन : आमदार किशोरआप्पा पाटील यांचे मार्गदर्शन

पाचोरा – आगामी गणेशोत्सव व ईद-दुर्गोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे करण्यासाठी पाचोरा शहर व तालुक्यात शांतता समितीची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी भवनात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान आमदार किशोरआप्पा पाटील यांनी भूषवले होते. प्रमुख उपस्थिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांची होती.

बैठकीत तहसीलदार विजय बनसोडे, प्रभारी डीवायएसपी अरुण आव्हाड, पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार, नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, विद्युत मंडळाचे भरत उकलकर तसेच महसूल, पोलीस व विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीची सुरुवात अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन करण्यात आली. प्रास्ताविक पोलीस निरीक्षक पवार यांनी करताना आगामी उत्सव काळात शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी मार्गदर्शन करताना अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी परवानग्यांसाठी ‘एक खिडकी अभियान’ राबविण्याचे तसेच प्रत्येक मंडळात महिलांचा सक्रिय सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. तहसीलदार बनसोडे यांनी ध्वनीप्रदूषण टाळणे, कायद्याचे पालन आणि बंधुभाव वाढविण्याचे आवाहन केले.

या वेळी आमदार किशोरआप्पा पाटील यांनी सांगितले की, गणेशोत्सव हा धार्मिकतेसोबत सामाजिक ऐक्य व संस्कारांचा उत्सव आहे. “मूर्तींची उंची न वाढवता विचारांची उंची वाढवावी. युवकांनी सकारात्मकतेचे बीज पेरून समाजात सौहार्द व सद्भावना वृद्धिंगत करावी,” असे त्यांनी नमूद केले.

बैठकीत विविध ठराव मंजूर करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक मंडळात महिलांचा सहभाग, वर्गणीसाठी सक्ती टाळणे, अमली पदार्थांपासून मुक्त उत्सव, मंडळासाठी एक जबाबदार कर्मचारी नेमणे, वीजपुरवठा सुरळीत ठेवणे तसेच पोलिस व स्वयंसेवकांच्या मदतीने सुरक्षा व्यवस्था सुनिश्चित करणे या मुद्द्यांचा समावेश होता. शेवटी राष्ट्रगीताने बैठकीचा समारोप झाला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम