
गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सलोख्याला धक्का; एकता संघटना आक्रमक
गणेश विसर्जन मिरवणुकीत सामाजिक सलोख्याला धक्का; एकता संघटना आक्रमक
जळगाव: यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान जळगाव जिल्ह्यातील फैजपूर विभागातील साकळी, यावल, चिनावल आणि हिंगोणा या गावांमध्ये काही गणेश मंडळांनी जाणीवपूर्वक मशिदीजवळ वाद निर्माण करून सामाजिक सलोख्याला धक्का पोहोचविल्याचा आरोप ‘एकता संघटनेने’ केला आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत संघटनेने जिल्हा पोलीस अधीक्षक आणि फैजपूर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे.
पोलिसांच्या उपस्थितीतही अनुचित प्रकार
एकता संघटनेच्या म्हणण्यानुसार, विसर्जन मिरवणुकीदरम्यान साकळी, चिनावल (ता. यावल) आणि हिंगोणा (ता. फैजपूर) येथे काही समाजकंटकांनी जाणूनबुजून दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, या घटना घडत असतानाही पोलीस उपस्थित असूनही त्यांच्याकडून कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे जिल्ह्यात तणाव आणि भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.
पोलिसांचे शांततेचे आवाहन
एकता संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदन दिल्यानंतर फैजपूर पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांनी आश्वासन दिले की, “आपण शांतता राखा, तुमच्यावर अन्याय होणार नाही. ज्यांनी चुकीचे वर्तन केले आहे, त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल.” तसेच, फैजपूर पोलीस स्टेशनचे प्रमुख एपीआय मोताळे यांनीही तक्रारींची सखोल तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
एकता संघटनेच्या प्रमुख मागण्या
या भेटीदरम्यान, एकता संघटनेने पोलीस प्रशासनासमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या:
- सर्व घटनांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी.
- जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळांजवळ विसर्जनावेळी पोलिसांचा बंदोबस्त अनिवार्य करावा.
- या घटनांच्या वेळी निष्क्रिय राहिलेल्या पोलीस अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी.
पोलिस प्रशासनाच्या आश्वासनाचे स्वागत करत, जळगावचे मुफ्ती खालिद आणि फारुख शेख यांनी सर्व समाजबांधवांना शांतता आणि बंधुता टिकवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. शिष्टमंडळात अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम