
गरीब, गरजू आणि होतकरू ७४ विद्यार्थिनींना एक लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत
बेंडाळे महाविद्यालयाचा उपक्रम
गरीब, गरजू आणि होतकरू ७४ विद्यार्थिनींना एक लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत
बेंडाळे महाविद्यालयाचा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी डॉ.अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे कनिष्ठ व वरिष्ठ महिला महाविद्यालयातील ‘विद्यार्थिनी कल्याण निधी योजना’, ‘माजी विद्यार्थिनी संघ’ व ‘माझा रुपया माझ्या गरजू मैत्रिणीसाठी’ या विविध योजनांच्या माध्यमातून महाविद्यालयातील गरीब, गरजू आणि होतकरू ७४ विद्यार्थिनींना एक लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. ‘विद्यार्थिनी कल्याण निधी’ योजना यामध्ये महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर बंधू-भगिनी आपल्या वाढदिवसानिमित्त निधी जमा करीत असतात. या शैक्षणिक वर्षात विविध विभागातील २४ विद्यार्थिनींना मदत देण्यात आली. ‘माजी विद्यार्थिनी संघा’ला महाविद्यालयातून शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसाय करणाऱ्या माजी विद्यार्थिनींकडून आर्थिक मदत प्राप्त होते. या संघाकडून या शैक्षणिक वर्षात विविध विभागातील ३० विद्यार्थिनींना मदत देण्यात आली. ‘माझा रुपया माझ्या गरजू मैत्रिणीसाठी’ या योजनेत विद्यार्थिनी, महाविद्यालयीन कर्मचारी व महाविद्यालयात विविध कार्यक्रमांसाठी येणारे मान्यवर आर्थिक मदत करतात. या योजनेअंतर्गत महाविद्यालयात विविध ठिकाणी पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या योजनेतून या शैक्षणिक वर्षात ०२ विद्यार्थिनींना मदत देण्यात आली.
या विविध योजनांच्या माध्यमातून महाविद्यालयातील गरीब, गरजू आणि होतकरू विद्यार्थिनींना मिळणाऱ्या आर्थिक मदतीची प्रवेश शुल्क, परीक्षा शुल्क भरण्यासाठी आणि इतर शैक्षणिक कामांसाठी मदत होते. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात दि. २३ एप्रिल २०२५ रोजी आर्थिक सहाय्य देण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी महाविद्यालयाच्या मा.प्राचार्य डॉ. गौरी राणे, उपप्राचार्य प्रा.डॉ.व्ही.जे.पाटील, डॉ.पी.एन.तायडे, सौ सुनीता पाटील, डॉ. दिपक किनगे, प्रा.संध्या फेगडे, ग्रंथपाल शिरीष झोपे, प्रा नितीन बावस्कर आणि सुहास बोरोले, गोपाल सोनवणे यांच्या हस्ते आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी डॉ.एस.जे.बाविस्कर, प्रा.आर.एन.महाजन, प्रा.सायली पाटील, प्रा वीणा चौधरी, राकेश वाणी, नागेश कासारे आणि राजू तायडे यांनी परीश्रम घेतले. क. ब. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव च्या संपूर्ण परीक्षेत्रामध्ये स्वनिधीतून आर्थिक मदत देणारे डॉ.अण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम