
गाझामधील युद्ध व भुकेच्या संकटावर त्वरित कृती करावी ; एकता संघटनेची भारतीय दूतावासा तर्फे मागणी
जळगाव, ६ ऑगस्ट २०२५ : गाझा येथे सुरू असलेल्या युद्ध, भूकबळी, बालमृत्यू आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात आज ‘एकता संघटना, जळगाव’ यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शांततामय निदर्शने करण्यात आली. भारत सरकारने आंतरराष्ट्रीय स्तरावर तातडीने मानवी हस्तक्षेप करावा यासाठी जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवणे हा या निदर्शनांचा मुख्य उद्देश होता.
निदर्शनानंतर संघटनेच्या वतीने आलेमा नजिया आणि मुफ्ती खालिद यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर केले. या निवेदनात, भारताचे परराष्ट्र मंत्री यांच्या माध्यमातून संयुक्त राष्ट्र (UN) आणि इस्लामिक कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (OIC) या संस्थांनी गाझा प्रश्नावर तातडीने पाऊले उचलावीत अशी मागणी करण्यात आली.

निवेदनातील प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत: १. भारत सरकारने गाझामधील त्वरित युद्धविरामासाठी आपला पाठिंबा जाहीर करावा. २. अन्न, पाणी आणि औषधे यांसारख्या अत्यावश्यक गरजा पोहोचवण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करावा. ३. निरपराध नागरिकांच्या संरक्षणासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी. ४. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय इस्लामिक संस्थेमार्फत स्वतंत्र आंतरराष्ट्रीय दबाव आणून हे युद्ध त्वरित थांबवावे.
संघटनेचे समन्वयक फारूक शेख यांनी सांगितले की, हे निवेदन भारतीय संविधान आणि मानवतेच्या मूलभूत मूल्यांवर आधारित आहे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हे निवेदन भारत सरकारच्या विदेश मंत्रालयाकडे आणि त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघ तसेच आंतरराष्ट्रीय इस्लामिक संघटनेकडे पाठवले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या निदर्शनांमध्ये मुफ्ती खालिद, फारूक शेख, सय्यद चांद, हाफ़िज़ रहीम पटेल, अनीस शाह, मतीन पटेल यांच्यासह शेकडो पुरुष व महिलांची उपस्थिती होती. महिलांमध्ये शबीना सय्यद, नाझिया अहमद, रुबीना शेख, नसरीन शेख, मसीरा शेख, मुमताज शेख, परविन शेख आदींनी सहभाग घेतला.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम