
गिरड शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले
गिरड शिवारात ऊसाच्या शेतात बिबट्याचे तीन बछडे आढळले
मजूर-शेतकरी धास्तावले; मादी असण्याची शक्यता, पिंजऱ्याची मागणी
भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील गिरड शिवारात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा समोर आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगळवारी सकाळी ऊस तोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी व ऊसतोड मजूर वर्गात प्रचंड घबराट पसरली असून, वन विभागाने तत्काळ पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी होत आहे.
गिरड येथील शेतकरी नंदू मोतीराम पाटील यांच्या गट क्रमांक १४९ मधील चार एकर क्षेत्रात ऊस तोडणीचे काम सुरू होते. सकाळी सुमारे सात वाजेच्या सुमारास मजूर कामात व्यस्त असताना सोनू सुरेश नाईक व संजय भिवसन नाईक यांना ऊसाच्या दाट कडीत बिबट्याचे तीन लहान बछडे दिसून आले. अचानक बछडे समोर आल्याने मजुरांची मोठी धावपळ उडाली. त्यांनी तातडीने ही माहिती शेतमालक नंदू पाटील व रवींद्र पाटील यांना दिली. त्यानंतर पोलीस पाटील विनोद मनोरे यांच्या माध्यमातून वन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली.
दरम्यान, मागील आठवड्यात गिरड येथील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता. तसेच अंतुर्ली व भातखंडे परिसरात बिबट्याने गाय व वासरावर हल्ला केल्याच्या घटनाही नुकत्याच घडल्या आहेत. सध्या रब्बी हंगामामुळे शेतशिवारात मोठ्या प्रमाणात हिरवळ असून, बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत असल्याने तो कधी आणि कुठून हल्ला करेल, याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
जंगली श्वापदाच्या भीतीने अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. निंदणी, कोळपणी व ऊस तोडणीची कामे सुरू असतानाच बछडे आढळल्याने मजूर वर्गाने शेतात येण्यास नकार दिला आहे. विशेषतः महिला मजूरांनी कामावर येणे बंद केल्यामुळे शेतीची कामे ठप्प झाली आहेत. बछडे आढळल्याने मादी बिबट्या परिसरातच असल्याची शक्यता अधिक बळावली असून, नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.
वन अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेची माहिती मिळताच वन क्षेत्रपाल सरिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नंदू पाटील, वनरक्षक श्रीमती अंभोरे, शिवदे, संदीप पाटील तसेच वनमजूर छोटू राठोड व सुभाष राठोड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी ऊस तोडणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून, मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात चार ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम