गिरणा धरणातील पाणी कालव्यात सोडा; शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा...

गिरणा धरणातील पाणी कालव्यात सोडा; शिवसेनेची मागणी
लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयात निवेदन
जळगाव (प्रतिनिधी) – पावसाच्या खंडामुळे पिके धोक्यात आल्याने, गिरणा धरणातून विसर्ग होणारे पाणी तातडीने कालव्यातून सोडावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे. या मागणीसाठी १० सप्टेंबर रोजी त्यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरण कार्यालयात निवेदन दिले.

शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाढा

या शिष्टमंडळात माजी खासदार उन्मेष पाटील, शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, नगराध्यक्ष निलेश चौधरी आणि इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी अधिकाऱ्यांसमोर शेतकऱ्यांच्या अडचणी मांडल्या. गेल्या २१ दिवसांपासून पावसात खंड पडल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे, तर १६ ऑगस्टच्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

कालव्यांची दुरुस्ती करून पाणी सोडण्याच्या सूचना

या शिष्टमंडळाने अधीक्षक अभियंता भोसले यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावेळी गिरणा नदीत मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग होत असून, ते वाया जात असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पाण्याला जामदा आणि दहीगाव बंधाऱ्यांतून कालव्यामार्गे शेतापर्यंत पोहोचवण्याची मागणी केली. भोसले यांनी तातडीने धरणगावचे उपकार्यकारी अभियंता तुषार राजपूत यांना फोन करून दोन दिवसांत कालव्यांची दुरुस्ती करून पाणी सोडण्याचे आदेश दिले. यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी भरण्यास मदत होईल आणि रब्बी हंगामासाठी पाणी उपलब्ध होईल, अशी आशा आहे.

रब्बी हंगामासाठीही लवकर पाणी सोडावे

सध्या गिरणा धरणाचे पाणी २० हजार हेक्टरपैकी फक्त १२ हजार हेक्टर क्षेत्रापर्यंत पोहोचत असून, उर्वरित ८ हजार हेक्टर शेतीलाही पाणी मिळावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, अनेक शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय नसल्याने रब्बी पिकांची पेरणी करणे शक्य होत नाही. त्यामुळे रब्बी हंगामासाठीचे पहिले आवर्तन जानेवारीऐवजी डिसेंबरमध्येच सोडावे, अशीही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली आहे.

 

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम