
गिरणा धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गिरणा धरणातून आजपासून पाण्याचा विसर्ग सुरू; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
चाळीसगाव प्रतिनिधी पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरणात आज सकाळी ६ वाजेपर्यंत ९५.७५% पाणीसाठा जमा झाला आहे. प्रकल्पाचे द्वार परिचलन वेळापत्रकानुसार १५ सप्टेंबरपर्यंत ९६% पाणीसाठा ठेवणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे आज दुपारी १ वाजता धरणाचे दरवाजे उघडून गिरणा नदीत ५०० ते १००० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे.
पाण्याची आवक वाढल्यास विसर्ग वाढणार
सध्या गिरणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून जवळपास २५०० क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. पाण्याची आवक वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढवले जाईल, असे पाटबंधारे विभागाने कळवले आहे.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
गिरणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी आपली गुरेढोरे, शेतीतील मोटार पंप आणि इतर वस्तू सुरक्षित ठिकाणी हलवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नदीपात्रात सुरू असलेल्या बांधकामांच्या संबंधित विभागांनाही आपली साधने आणि साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
याबाबत उपविभागीय अभियंता, पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव यांनी सर्व संबंधित शासकीय यंत्रणांना दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम