
गिरणा धरणात जलसाठ्यात मोठी वाढ; शेतकऱ्यांना दिलासा
गिरणा धरणात जलसाठ्यात मोठी वाढ; शेतकऱ्यांना दिलासा
चाळीसगाव, दि. २ ऑगस्ट – सततच्या पावसामुळे गिरणा धरणात जलसाठ्याची पातळी झपाट्याने वाढत असून, शनिवारी सकाळी ११ वाजेपर्यंत धरणात ६५ टक्के जलसाठा जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. या वाढत्या पाणीसाठ्यामुळे नदीकाठच्या गावांतील नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पावसाळा सुरू होण्यापूर्वी गिरणा धरणात केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक होता. मात्र जुलैच्या उत्तरार्धापासून नाशिक व जळगाव जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे गिरणा धरणात पाण्याची भर घालणाऱ्या नद्यांमध्ये चांगला प्रवाह निर्माण झाला आहे. त्यामुळे धरणात ४४ टक्क्यांची भर पडली असून, जलसाठा आता ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे.
गिरणा पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास येत्या आठवड्यात धरण ८० टक्क्यांपर्यंत भरू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
धरणात होत असलेल्या या जलसाठ्यामुळे शेतीसाठी आवश्यक असलेला पाणीपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता वाढली असून, पेरण्या व रोपांची वाढ चांगली होण्याकडे शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम