
गॅरेजवर बालकामगार वापरणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल
गॅरेजवर बालकामगार वापरणाऱ्या मालकावर गुन्हा दाखल
अल्पवयीन मुलाकडून काम करून घेतल्याप्रकरणी कामगार विभागाची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी) – शहरातील प्रेमनगर परिसरातील एका गॅरेजवर अल्पवयीन मुलाकडून श्रम करून घेतल्याच्या प्रकरणी गॅरेज मालक मुकेश आधार कोळी (वय २८, रा. प्रेमनगर) याच्यावर कामगार विभागाने कारवाई करत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात बाल न्याय कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
बालकामगार विरोधी मोहिमेदरम्यान उघड झाला प्रकार
जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त कामगार विभागाने बालकामगार मुक्ततेसाठी विशेष मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेअंतर्गत दि. ४ जून रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयातील दुकाने निरीक्षक जितेंद्र सुभाष पवार व सुपरवायझर निलेश चौधरी हे बजरंग बोगद्याजवळून पिंप्राळाकडे जात असताना, पेट्रोल पंपाजवळील एका गॅरेजवर वाहन दुरुस्ती करत असलेला अल्पवयीन मुलगा त्यांच्या लक्षात आला.
त्यांनी तत्काळ गॅरेज मालकाशी चौकशी केली असता, सदर मुलगा दररोज ३ ते ४ तास काम करत असल्याची माहिती मिळाली. त्याबदल्यात केवळ ३०० रुपये रोज देण्यात येत असल्याचेही स्पष्ट झाले.
आर्थिक व मानसिक शोषणाचा आरोप
गॅरेज मालक मुकेश कोळी याने मुलाचा आर्थिक आणि मानसिक शोषण केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्याकडून कमी मोबदल्यात अधिक श्रम करून घेतल्याने त्याच्यावर क्रूर वागणुकीचा आणि बाल न्याय (किशोर न्याय) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कामगार विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अशा प्रकारच्या बालकामगार प्रकरणांवर पुढील काळातही कठोर कारवाई करण्यात येणार असून जनतेने देखील यासंदर्भात सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम