
गोडाऊन फोडून गोण्या लांबविणाऱ्या टोळीला अटक
८.३५ लाखांचा माल जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
गोडाऊन फोडून गोण्या लांबविणाऱ्या टोळीला अटक
८.३५ लाखांचा माल जप्त ; एमआयडीसी पोलिसांची कारवाई
जळगाव (प्रतिनिधी): जळगाव एमआयडीसी परिसरातील गोडाऊन फोडून ८ लाख ३५ हजार रुपये किमतीचा माल चोरणाऱ्या टोळीला एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक केली आहे. या कारवाईत चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
एमआयडीसीतील एम सेक्टर २११/२ येथे अतुल विश्वनाथ मुळे यांच्या मालकीची ‘श्री प्रभु डिस्ट्रीब्युटर्स’ ही कंपनी आहे. ही कंपनी जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत रामबंधू मसाले कंपनीची अधिकृत डीलरशिप सांभाळते.
२५ मार्च २०२५ रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे शटर तोडून आत प्रवेश करत ७१ गोण्या मसाल्यांचा साठा चोरला. चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत ८.३५ लाख रुपये आहे. २७ मार्च रोजी अतुल मुळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर गुन्हा क्रमांक २२९/२०२५ अन्वये भादंवि कलम ३३१ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले.त्यानुसार, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक तपासासाठी सक्रिय झाले.
पोलीस उपनिरीक्षक: राहुल तायडे पोलीस कर्मचारी: चंद्रकांत धनके, राहुल रगडे, गणेश ठाकरे, विशाल कोळी, सिद्धेश्वर डापकर, रतन गितेयांच्या पथकाने हि कारवाई केली.
पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले, यात आरोपींनी तोंडाला रुमाल बांधून ईको कारच्या मदतीने चोरी केल्याचे स्पष्ट झाले. तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटवली.
या तपासात मुख्य आरोपी अनिल रमेश पाटील (रा. मिल कॉलनी, खडका, ता. भुसावळ) असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे अनिल पाटील हा फिर्यादी अतुल मुळे यांच्या कंपनीत १५ वर्षांपासून चालक म्हणून कार्यरत होता.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता, त्याने गुन्ह्याची कबुली देत आपल्या सहकारी आरोपींची नावे उघड केली. यानंतर पोलिसांनी संपूर्ण चोरीचा माल जप्त केला. कारवाईमुळे एमआयडीसी परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले असून, पोलिसांच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम