
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात मध्यरात्री चोरी
गोदावरी आयएमआर महाविद्यालयात मध्यरात्री चोरी
लेखापाल विभागातून एक लाख रोख व सीसीटीव्ही एनव्हीआर लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद
जळगाव (प्रतिनिधी) – गोदावरी आयएमआर महाविद्यालयाच्या लेखापाल विभागात मध्यरात्री चोरट्यांनी प्रवेश करून एक लाख रुपये रोख व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा एनव्हीआर असा सुमारे १.०५ लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. १८ जुलैच्या मध्यरात्री ही घटना घडली असून एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ जुलै रोजी महाविद्यालयाच्या सर्व विभागांचे दरवाजे बंद करून अधिकारी व कर्मचारी घरी गेले होते. त्यानंतर मध्यरात्री चोरट्यांनी मुख्य प्रवेशद्वार उघडून महाविद्यालयात प्रवेश केला व लेखापाल विभागाचा दरवाजाही उघडून आत प्रवेश केला.
लेखापाल विभागात विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी जमा झालेले एक लाख रुपये रोख रक्कम टेबलच्या काउंटरमधून लांबवण्यात आली. तसेच रोकड मिळवण्यासाठी चोरट्यांनी कपाटे, काउंटर फोडले. दस्तऐवज अस्ताव्यस्त फेकून दिले. त्याच परिसरातील गोदावरी इंग्लिश मिडियम सीबीएसई शाळेच्या लेखापाल विभागातही अशीच तोडफोड करण्यात आली.
सीसीटीव्हीत चोरटे कैद
या चोरीची घटना महाविद्यालयाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्यात एक जण बाहेर उभा राहून पहारा देत होता, तर दोन जण आत प्रवेश करून चोरी करताना दिसून येतात. तिघांनीही चेहऱ्यावर रुमाल बांधलेले होते.
चोरीसह झालेल्या या तोडफोडीमुळे संस्थेचे मोठे नुकसान झाले असून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली असून चोरट्यांचा लवकरच माग काढण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम