
गोलाणी मार्केटमधून १० लाखांचे सोने घेऊन दोन कारागीर फरार
१५ वर्षांच्या विश्वासाला तडा!
गोलाणी मार्केटमधून १० लाखांचे सोने घेऊन दोन कारागीर फरार
१५ वर्षांच्या विश्वासाला तडा!
जळगाव, प्रतिनिधी: गोलाणी मार्केटमधील एका ज्वेलरी दुकानातून तब्बल ९ लाख ७० हजार रुपये किमतीचे १४३.८६० ग्रॅम सोने घेऊन दोन कारागीर फरार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, हे दोघे गेल्या १५ वर्षांपासून विश्वासाने काम करत होते, त्यामुळे या अपहाराने ज्वेलरी व्यवसायात खळबळ उडाली आहे.
श्यामसुंदर अंबालाल सोनी (रा. पटेल नगर) यांचे गोलाणी मार्केटच्या चौथ्या मजल्यावर दागिने बनवण्याचे दुकान आहे. १३ सप्टेंबर २०२४ रोजी रतनलाल सी. बाफना ज्वेलर्सकडून त्यांच्याकडे तयार कामासाठी वरील सोने आले होते. सोने संजय शंकर सातरा (रा. घोरादहा, जि. हुबळी, पश्चिम बंगाल) आणि मुस्तफा अली (रा. बागनान, जि. हावडा, पश्चिम बंगाल) या विश्वासू कारागिरांना दिले गेले होते.
मात्र दुसऱ्या दिवशी दुकान उघडल्यावर दोघेही गायब असल्याचे लक्षात आले. इतर कारागिरांनी सांगितले की, रात्री सर्वजण झोपले असताना हे दोघे निघून गेले. फोनवर संपर्क साधला असता त्यांनी “महत्त्वाचं काम आहे, ८-१० दिवसांत सोने परत करतो” असे आश्वासन दिले. मात्र काही दिवसांनंतर दोघांचेही मोबाईल बंद येऊ लागले.
यानंतर श्यामसुंदर सोनी यांनी १५ एप्रिल २०२५ रोजी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संजय सातरा आणि मुस्तफा अली यांच्याविरोधात अपहाराचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
या प्रकारामुळे सोनार व्यावसायिकांमध्ये सावधगिरीची भावना निर्माण झाली आहे. १५ वर्षांचा विश्वास असा फसवणुकीत संपुष्टात येणं, हे अनेक व्यवसायिकांसाठी धक्कादायक ठरत आहे. पोलिसांच्या तपासातून लवकरच आरोपींचा शोध लागेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम