
गो. से. महाविद्यालयात स्व. डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
गो. से. महाविद्यालयात स्व. डॉ. एस. आर. रंगनाथन जयंती उत्साहात साजरी
खामगाव (प्रतिनिधी) विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय खामगाव येथे सोमवार दिनांक १२ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२ वाजता महाविद्यालयाच्या ग्रंथालयामधे भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक स्व. डॉ. एस. आर. रंगनाथन यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख (उर्दू विभाग प्रमुख व अध्यक्ष, उर्दू अभ्यास मंडळ, सं. गा. बा. अमरावती विद्यापीठ, अमरावती), ग्रंथालय समिती समन्वयक डॉ. पी. पी. ठाकुर, सदस्य डॉ. बी. एम. टकले, तसेच सहाय्यक ग्रंथपाल श्री. संजय गुळभेले मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. पी. पी. ठाकुर यांनी केले. ते आपल्या भाषणा मधे म्हणाले “ग्रंथालय ही केवळ पुस्तके ठेवायची जागा नाही, तर ती विचारांची देवाण-घेवाण घडवणारी प्रयोगशाळा आहे. रंगनाथन यांनी दाखवलेला मार्ग म्हणजे वाचनसंस्कृती वाढवण्याचा आणि ज्ञान सर्वांसाठी खुलं करण्याचा मार्ग. आज आपण मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात जगत आहोत, पण योग्य माहिती निवडण्याची शहाणपणाची कला आपल्याला ग्रंथालयच शिकवते.” त्यानंतर प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी समयोचित विचार व्यक्त केले. त्यांनी सांगितले, “आज आपण भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त एकत्र आलो आहोत. त्यांनी मांडलेले ‘ग्रंथालयाचे पाच मूलभूत नियम’ आजही तितकेच मार्गदर्शक आहेत. वाचन ही केवळ माहिती मिळवण्याची प्रक्रिया नसून, ती व्यक्तिमत्त्व घडवण्याची आणि समाज घडवण्याची गुरुकिल्ली आहे. आपण सर्वांनी पुस्तकांशी मैत्री करून वाचन संस्कृतीचा वारसा पुढे नेला पाहिजे.”
आपल्या अध्यक्षीय भाषणा मधे उपप्राचार्य डॉ. प्रफुल उबाळे यांनी स्व. डॉ. रंगनाथन यांच्या कार्याचा गौरव करताना त्यांच्या कार्याने भारतीय ग्रंथालयांना नवा आकार आणि दिशा मिळाली असे प्रतिपादन केले. ‘ग्रंथालयाचे पाच मूलभूत नियम’ हे फक्त ग्रंथालय व्यवस्थापनाचे तत्त्वज्ञान नसून, ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या आणि वाचकाच्या जीवनाला दिशा देणारे मार्गदर्शक आहेत. ज्ञान ही एकमेव अशी संपत्ती आहे जी जितकी वाटली जाते तितकी वाढते. त्यामुळे आपण सर्वांनी वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे, पुस्तकांशी मैत्री करणे आणि माहितीचे योग्य मूल्यांकन करणे हे आपले कर्तव्य आहे. आज ग्रंथालये डिजिटायझेशनच्या दिशेने पुढे जात आहेत आणि या बदलाच्या काळातही डॉ. रंगनाथन यांचे विचार तेवढेच महत्त्वाचे आणि उपयुक्त राहतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल श्री. संजय गुळभेले यांनी केले. या कार्यक्रमाला ग्रंथालय समितीचे सदस्य डॉ. बी. एम. टकले तसेच कर्मचारी श्री. पी. व्ही. मेटे, श्री. जी. एम. सुरवाडे, श्री. पी. एन. सोळंके, श्री. महादेव वानखेडे, ग्रंथालय सहायिका कु. कीर्ती टिकार, कु. प्रियंका भिसे आणि महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम