घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद ; नंदुरबार एलसीबीची कारवाई
23 लाख 34 हजार 310 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त
घरफोड्या करणारी आंतरराज्य टोळी जेरबंद ; नंदुरबार एलसीबीची कारवाई
23 लाख 34 हजार 310 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त
नंदुरबार प्रतिनिधी
नंदुरबारसह महाराष्ट्र ,मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेशात घरफोड्या करणाऱ्या टोळीला नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले असून त्याच्याकडून 23 लाख 34 हजार 310 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली.
जिल्हा पोलीस वसाहतीत चोरट्यांनी 29 ते 30 डिसेंबर 2024 दरम्यान चार लाख दोन हजारांची घरफोडी केली होती. नंदुरबार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत ही घरफोडी मध्यप्रदेश राज्यातील आरोपींनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या होत्या .
सबत प्यारसिंग अनारे (29, रा.थिलवाणी, पोस्टे पिंप्रापाणी, ता.कुक्षीख, जि.धार, मध्यप्रदेश), मनसिंग सदनसिंग चव्हाण (21, रा.कुतेडी, नरवाली, ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी इतर साथीदारांसह नंदुरबार शहरात घरफोडीची कबुली दिली. आरोपींचा साथीदार आरोपी फुलसिंग हरसिंग मंडलोई (सिंगाचोरी, ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) हा चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी कुक्षी येथे येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच पथकाने फुलसिंग हरसिंग मंडलोई (23, रा.सिंगाचोरी, ता.कुक्षी, जि.धार, मध्यप्रदेश) तसेच चोरीचा माल घेणारा सोनार नामे राजललीत सोनी (30, रा.जोबट, जि..अलिराजपुर, मध्यप्रदेश), हार्दिक कुमार जसवंत भाई सोनी (32, रा.गरबडा, ता.गरबडा, जि.दाहोद, गुजरात) यांना अटक करताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींनी नंदुरबार शहर, शहादा, तळोदा येथे घरफोडीची कबुली दिली. दरम्यान, आरोपींचे अन्य चार साथीदार पसार असून अटकेतील पाचही आरोपींना न्यायालयाने 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपींच्या ताब्यातून 23 लाख 34 हजार 310 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम जप्त करण्यात आली. नंदुरबार शहर, नंदुरबार तालुका, शहादा, तळोदा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीचा गुन्हा उघडकीस आला. आरोपींनी महाराष्ट्र, आंध्रप्रदेश राज्यात सुध्दा घरफोडी केल्याची शक्यता आहे. तपास नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ करीत आहेत.
ही कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, राकेश मोरे, विशाल नागरे, बापू बागुल, मोहन ढमढेरे, अभय राजपुत, विजय धीवरे आदींच्या पथकाने केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम