
घरात कुणीही नसताना विवाहितेने घेतला गळफास
घरात कुणीही नसताना विवाहितेने घेतला गळफास
आठ महिन्याच्या बाळावर मातृत्वाची छाया कायमची हरपली
वरणगाव (प्रतिनिधी) : भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथे आठ महिन्याच्या चिमुकल्या बाळाची आई असलेल्या एका २१ वर्षीय विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी (दि. १९) रात्री उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
उज्वला अलकेश कोळी (वय २१, रा. तपत कठोरा, ता. भुसावळ) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वला कोळी हिने शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घरात कोणीही नसताना घरातील छताच्या हुकाला दोरी बांधून गळ्याला गळफास घेतला. काही वेळाने घरचे सदस्य घरी परतल्यानंतर ही घटना त्यांच्या लक्षात आली.
त्यानंतर उज्वलाला तातडीने वरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. उज्वलाने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.
मयत उज्वलाला अवघा आठ महिन्यांचा मयुरेश नावाचा मुलगा असून आई शब्द उच्चारण्याआधीच तो कायमचा पोरका झाल्याने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी निलेश सुरेश तायडे यांच्या खबरीवरून वरणगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास उपनिरीक्षक मंगेश बोडकोळी हे करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम