चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड

बातमी शेअर करा...

चारचाकी वाहने चोरणारी आंतरराज्य टोळी गजाआड

जळगाव एलसीबी पथकाची धाडसी कारवाई; आठ दिवस राजस्थानच्या वाळवंटात दबा धरून तीन गाड्या हस्तगत

जळगाव : जळगाव शहरातून एका रात्रीत चोरी गेलेल्या तीन महागड्या चारचाकी वाहनांच्या तपासातून एलसीबी पथकाने आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी राजस्थानमधून दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक इनोव्हा क्रिस्टा कार हस्तगत करण्यात आली आहे. ही कारवाई करताना एलसीबीच्या पथकाने आठ दिवस राजस्थानच्या वाळवंटात आणि जंगलात तळ ठोकून संशयितांवर लक्ष ठेवले होते.

गुन्ह्याची पार्श्वभूमी :
एप्रिल २०२५ च्या पहिल्या आठवड्यात जळगाव शहरातील रामानंदनगर, तालुका पोलीस ठाणे आणि जिल्हा पेठ हद्दीतून एका रात्रीत तीन महागड्या गाड्या चोरीला गेल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला तपास सोपविण्यात आला होता. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एलसीबी निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास सुरू केला.

तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे शोध:
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले, मोबाईल लोकेशन्सचे विश्लेषण केले आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने संशयितांपर्यंत पोहोचले. यावेळी दोघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून इतर आरोपींचा शोध घेत राजस्थान गाठण्यात आले.

राजस्थानमध्ये धाडसी मोहिम:
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, हवालदार विजय पाटील, आणि इतर पथकाने जालोर जिल्ह्यात आठ दिवसांहून अधिक काळ तळ ठोकून संशयितांवर लक्ष ठेवले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने सांचोरच्या जंगलात लपवलेली इनोव्हा क्रिस्टा कार हस्तगत करण्यात आली. ती गाडी १००० किलोमीटरचा प्रवास करून जळगावला आणण्यात आली.

पथकाचे कौतुकास्पद कार्य:
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, सहायक फौजदार अतुल वंजारी, हवालदार हिरालाल पाटील, विजय पाटील आणि चालक पोलीस शिपाई महेश सोमवंशी यांच्या पथकाने केली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम