
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून; पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे धक्कादायक घटना
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा निर्घृण खून; पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे धक्कादायक घटना
पाचोरा: तालुक्यातील लोहारा गावात चारित्र्याच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी, १९ ऑगस्ट रोजी रात्री ११ ते १२ वाजेच्या सुमारास ही अमानुष घटना घडली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण? आरोपी पती नितीन दौलत शिंदे (वय ३५, रा. लोहारा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने आपली पत्नी अर्चना उर्फ कविता नितीन शिंदे (वय ३२) हिचा गाढ झोपेत असताना निर्घृण खून केला. त्यांच्या पश्चात एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.
मयत अर्चनाच्या भावाने, आकाश कडूबा सपकाळ (रा. सिल्लोड), यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नितीन आणि त्याची आई अर्चनाच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होते. तसेच, घर बांधण्यासाठी तिच्या माहेरच्या लोकांकडून १० लाख रुपये आणण्यासाठी ते तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करत होते.
मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास याच चारित्र्याच्या संशयावरून नितीनने धारदार शस्त्राने पत्नीवर वार केले, ज्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अरुण आव्हाड आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा यांच्यासह पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी आरोपी नितीन शिंदेला तात्काळ ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, जळगाव जिल्ह्यात सतत घडणाऱ्या खुनाच्या घटनांमुळे समाजमन सुन्न झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम