
चाळीसगावच्या माजी नगरसेवकावरील हल्ल्यातील आरोपींना अटक; पोलिसांनी काढली शहरातून धिंड
चाळीसगावच्या माजी नगरसेवकावरील हल्ल्यातील आरोपींना अटक; पोलिसांनी काढली शहरातून धिंड
चाळीसगाव: शहरातील माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर २६ ऑगस्ट रोजी झालेल्या प्राणघातक हल्ल्यातील तिन्ही आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींमध्ये सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी यांचा समावेश आहे. शहरात दहशत निर्माण करणाऱ्या या आरोपींना पोलिसांनी रविवार, ३१ ऑगस्ट रोजी शहरातून पायी धिंड काढून चांगलीच अद्दल घडवली.
भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे कमी करण्यासाठी पोलिसांनी कठोर पाऊल उचलले. आरोपींना पकडल्यानंतर पोलिसांनी रविवारी सकाळी ११ वाजता त्यांची शहरातून पायी धिंड काढली. पोलिसांनी केलेल्या या कारवाईने गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. धिंड पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
७ दिवसांची पोलीस कोठडी
धिंड काढल्यानंतर पोलिसांनी आरोपींना स्थानिक न्यायालयात हजर केले. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या काळात पोलीस या हल्ल्यामागील नेमके कारण, इतर आरोपींचा सहभाग आणि गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे याबद्दल सखोल चौकशी करणार आहेत. पोलिसांच्या या जलद आणि धडक कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम