
चाळीसगावमध्ये युवकावर किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला
चाळीसगावमध्ये युवकावर किरकोळ वादातून प्राणघातक हल्ला
चाळीसगाव: तालुक्यातील खडकी बुद्रुक येथे एका युवकावर जीवघेणा हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. दारूच्या अड्ड्याजवळ किरकोळ वादातून एका युवकाने दुसऱ्याच्या पोटात आणि बरगडीत चाकूने वार केले. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मण भास्कर गायकवाड (रा. खडकी बुद्रुक बायपास) हा १४ ऑगस्ट रोजी रात्री पाटखडकी गावाजवळील एका दारूच्या अड्ड्यावर दारू पीत होता. त्याचवेळी गौरव कैलास निपाणे हा तेथे आला आणि त्याने लक्ष्मणला दारू पाजण्याचा आग्रह केला.
लक्ष्मणने ‘मला भूक लागली आहे, घरी जायचे आहे,’ असे सांगून नकार दिल्याने गौरव निपाणे संतापला. त्यांच्यात शाब्दिक वाद सुरू झाला आणि या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. गौरवने लक्ष्मणला धक्का देऊन खाली पाडले आणि त्यानंतर जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटात आणि बरगडीत चाकूने वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या लक्ष्मण गायकवाडला प्रथम चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी धुळे येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
धुळे येथे पोलिसांनी लक्ष्मणचा जबाब नोंदवला. त्याच्या फिर्यादीनुसार, संशयित आरोपी गौरव निपाणे याच्याविरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये कलम ३०७ (जीवे ठार मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम