
चाळीसगावातील बँकेत माथेफिरूचा हैदोस
चाळीसगावातील बँकेत माथेफिरूचा हैदोस
दुकानांची तोडफोड, पोलिसांचा हस्तक्षेप
चाळीसगाव: शहरातील गायत्री व्यापारी संकुलातील एका बँकेत एका माथेफिरू तरुणाने अचानक हैदोस घालून दहशत निर्माण केली. हातापायात साखळदंड असलेल्या या तरुणाने बँकेत प्रवेश करून मोठ्याने आरडाओरड केली. त्याला रोखण्याचा प्रयत्न सुरक्षा रक्षकाने केला असता त्याच्यावरही तो धावून गेला. यानंतर बँकेत गोंधळ घातल्यानंतर त्याने इतर दुकानांत जाऊनही धुडगूस घातला आणि एका चहाच्या दुकानाची तोडफोड केली.
गुरुवारी दुपारी १ ते १.३० वाजेच्या सुमारास हा तरुण बँकेत शिरला. “मला पैशांचा भरणा करायचा आहे,” असे सांगत तो मोठ्याने बोलू लागला. सुरुवातीला कर्मचाऱ्यांना तो मनोरुग्ण वाटला, मात्र त्याचा आक्रमकपणा वाढत गेला. त्यामुळे सुरक्षा रक्षकाने त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याच्यावरही हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
बँकेत गोंधळ, ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण
या तरुणाने बँकेतील कर्मचाऱ्यांच्या मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला, जोरजोरात ओरडत ग्राहकांना घाबरवले. त्यामुळे घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ बँकेचे कुलूप लावून पोलिसांना माहिती दिली.
दुकानांमध्ये घुसून तोडफोड
बँकेतून बाहेर पडताच या तरुणाने परिसरातील काही दुकानांमध्ये घुसून आरडाओरड केली आणि एका चहाच्या दुकानात तोडफोड केली. त्याचा हैदोस सुरू असतानाच दुसऱ्या मजल्यावरून खाली उतरण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन पडला.
पोलिसांनी घेतला ताब्यात
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि या तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्या मानसिक स्थितीबाबत अधिक तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम