
चाळीसगावात बांधकाम कंपनीच्या कार्यालयातून ४५ लाखांची रोकड लंपास
चाळीसगाव: येथील शिवनेरी प्रकल्पाचे काम करणाऱ्या दोन बांधकाम कंपन्यांच्या कार्यालयातून तब्बल ४५ लाखांची रोकड आणि इतर साहित्य चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी कंपनीच्या प्रकल्प संचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, एका माजी कर्मचाऱ्याविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चाळीसगावातील मालेगाव रोडवर सुपरिअल्टी बिल्टकॉन एलएलपी मुंबई आणि लक्ष्मी वरद इन्फ्रा. प्रा. लि. या कंपन्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ‘शिवनेरी पार्क’ प्रकल्पावर काम करत आहेत. कर्मचाऱ्यांचे पगार आणि इतर खर्चांसाठी लागणारी सुमारे ४५ लाखांची रोकड ३० ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील कार्यालयात ठेवण्यात आली होती. यासोबतच, १६ हजार रुपयांची हार्डडिस्क आणि ३०० रुपयांचा पेन ड्राईव्ह असा एकूण ४५ लाख १६ हजार ३०० रुपयांचा ऐवजही तेथे होता.
ही रक्कम आणि इतर वस्तू गहाळ झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रकल्प संचालक राजेंद्र पाटील यांनी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात सकाळी ७.२६ वाजता एक तरुण वॉचमनकडून चावी आणि झाडू घेऊन आत शिरताना दिसला. बाहेर येताना तो एक गोणी घेऊन गेला.
या फुटेजच्या आधारे हा प्रकार कंपनीचा माजी कर्मचारी सुनील पंढरीनाथ चौधरी (रा. चाळीसगाव) यानेच केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले होते. तरीही तो कार्यालयात सफाईसाठी आल्याचे खोटे सांगून वॉचमनकडून चावी घेऊन आत शिरला आणि त्याने कपाटातील पिशवीतील रोख रक्कम, हार्डडिस्क आणि पेन ड्राईव्ह चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम