
चाळीसगावात मिठाई दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
चाळीसगावात मिठाई दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १९८ किलो खराब काजू जप्त
चाळीसगाव (प्रतिनिधी) – दिवाळीचा सण जवळ येत असताना मिठाईची मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. मात्र, याच काळात ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे चाळीसगावात उघडकीस आले आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने शहरातील अंबिका स्वीटच्या कारखान्यावर छापा टाकून तब्बल १९८ किलो कालवंडलेले व बुरशीजन्य काजू जप्त केले. या काजूंची बाजारभावात किंमत तब्बल २ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे.
कारखान्यात काजूकतली तयार करण्यासाठी हे निकृष्ट काजू वापरले जात असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले. याशिवाय खवा, मोतीचूर लाडू व पिस्ता बर्फी यांचे नमुनेही घेऊन छत्रपती संभाजीनगर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
तपासणीत कारखान्याला अन्न व्यवसायाचा परवाना नसल्याचे, मिठाई तयार करणाऱ्या कामगारांकडे आरोग्य प्रमाणपत्र नसल्याचे, तसेच ठिकाणी अस्वच्छता, असुरक्षितता आणि खरेदी-विक्रीची बिले नसल्याचेही समोर आले. संबंधित कारखाना देविसिंग मोतीसिंग राजपुरोहित यांचा असून त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे.
ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी सांगितले की, “दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारात असुरक्षित व निकृष्ट अन्नपदार्थ येऊ नयेत यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. संशयित १९८ किलो काजू जप्त करून मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासले जात आहेत. अहवाल आल्यानंतर कठोर कारवाई होईल.”

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम