
चाळीसगावात गावठी कट्ट्यासह तरुणाला अटक
शहर पोलिसांची कारवाई
चाळीसगाव प्रतिनिधी
गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूसासह राहता तालुक्यातील एकाला चाळीसगाव शहर पोलिसांनी अटक केल्याची घटना २५ रोजी दुपारी स्टेशन रोडवर करण्यात आली. किरण कैलास गायकवाड (21, मूळ रा.संक्सर ता.कोपरगाव, सध्या रा.शिर्डी बायपास, खंडोबा मंदिराजवळ ता.राहता) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चाळीसगाव शहर पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले, हवालदार योगेश बेलदार, राकेश पाटील, अजय पाटील, नितीन आगोणे व निलेश पाटील हे २५ रोजी दुपारी चाळीसगाव शहरात गस्त घालत असताना उपनिरीक्षक संदीप घुले यांना शहरातील स्टेशन रोडवरील हॉटेल विरामजवळ एक संशयीत गावठी कट्टा बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांच्यासह पथकाने धाव घेतली. संशयीत किरण गायकवाडची झडती घेतल्यानंतर त्याच्याकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळल्याने संशयीताला ताब्यात घेण्यात आले व त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरणाकुमार कबाडी व पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले व हवालदार राकेश पाटील करीत आहेत.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम