
चाळीसगाव टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; ४ ऑगस्टपासून पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित
चाळीसगाव टपाल विभागात ‘ए.पी.टी.’ प्रणालीचा शुभारंभ; ४ ऑगस्टपासून पोस्ट ऑफिसमध्ये कार्यान्वित
जळगाव, – भारतीय टपाल विभागाने डिजिटल युगाशी सुसंगततेने एक क्रांतिकारी पाऊल उचलत ‘ए.पी.टी. (Advanced Postal Technology)’ या नव्या डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्र उभारणी आणि डिजिटल उत्कृष्टतेच्या दिशेने चाललेल्या प्रवासात ही एक महत्त्वपूर्ण क्षणिका असून, या उपक्रमात चाळीसगाव मुख्य डाक घर अंतर्गत सर्व टपाल कार्यालयांमध्ये ही सुधारित प्रणाली दिनांक ४ ऑगस्ट २०२५ पासून कार्यान्वित करण्यात येणार आहे.
टपाल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ए.पी.टी. अॅप्लिकेशनच्या माध्यमातून टपाल सेवा अधिक जलद, सुरक्षित, ग्राहकाभिमुख व पारदर्शक होणार आहे. या प्रणालीच्या मदतीने पोस्ट ऑफिसमधील व्यवहारांची प्रक्रिया डिजिटल रूपात अधिक सुलभ होईल. सेवा वितरणाचा वेग वाढेल, तर ग्राहकांसाठी इंटरफेस अधिक सहज व समजण्याजोगा असेल. ही प्रणाली ग्रामीण व निमशहरी भागांतील नागरिकांनाही स्मार्ट व कार्यक्षम सेवा देण्यासाठी विशेष रचलेली आहे.
नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीपूर्वीची आवश्यक तांत्रिक कामे सुरळीतरीत्या पार पडण्यासाठी दिनांक २ ऑगस्ट २०२५ रोजी पोस्ट कार्यालयांमध्ये सार्वजनिक व्यवहार बंद राहतील. या काळात कोणतीही टपाल सेवा देण्यात येणार नाही. ही सेवाबंदी केवळ एका दिवसापुरती असणार असून त्यानंतर ४ ऑगस्टपासून नवीन प्रणालीसह सेवा पुन्हा पूर्ववत सुरु होतील.
नवीन प्रणालीच्या अंमलबजावणीमुळे नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या सेवा मिळतील. या छोट्या तांत्रिक व्यत्ययादरम्यान नागरिकांनी सहकार्य करावे व आपल्या व्यवहारांचे नियोजन योग्य वेळी करावे. असे आवाहन डाक अधीक्षक यांनी केले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम