
चिंचगव्हाणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ ; दोन शेळ्या व बोकड फस्त
चिंचगव्हाणमध्ये बिबट्याचा धुमाकूळ ; दोन शेळ्या व बोकड फस्त
चाळीसगाव प्रतिनिधी तालुक्यातील चिंचगव्हाण शिवारात बुधवारी सकाळी बिबट्याने तारेचे कुंपण ओलांडत दोन शेळ्या आणि एक बोकड ओढून नेल्याचा प्रकार समोर आला असून या घटनेमुळे परिसरातील शेतकरी पुन्हा एकदा दहशतीत आले आहेत.
चिंचगव्हाण येथील लक्ष्मण गंगाराम पाटील यांचे नदीलगत स्मशानभूमीजवळ शेत असून त्यांनी गुरे व शेळ्यांसाठी तारेचे कुंपण करून सुरक्षितता वाढवली होती. मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे गुरांना चारापाणी करून ते घरी गेले होते. मात्र बुधवारी सकाळी सुमारास ७ वाजता शेतात गेल्यावर दोन शेळ्या व एक बोकड गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. सुरुवातीला चोरीचा संशय घेतला असता दुपारी शेतातील तळ्याजवळ अंदाजे ६० ते ७० मीटर अंतरावर दोन मृत शेळ्या आढळून आल्या. त्यांच्या अवस्थेवरून हा हल्ला बिबट्यानेच केल्याचे स्पष्ट झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
बोकड मात्र अद्यापही बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे. या घटनेनंतर चिंचगव्हाण परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत. महिनाभरापूर्वीही याच भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. वाढत चाललेला बिबट्याचा वावर आणि वारंवार होणारे हल्ले पाहता वन विभागाने तातडीने उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम