
चित्रा चौक ते अजिंठा चौफुली रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई
चित्रा चौक ते अजिंठा चौफुली रस्त्यांवरील अतिक्रमणावर कारवाई
७० ते ८० विक्रेत्यांचे साहित्य केले जप्त
जळगाव : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन
विभागाकडून चित्रा चौक ते अजिंठा चौफुली रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले. या कारवाईत ७० ते ८० विक्रेत्यांचे साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे प्रमुख संजय ठाकुर यांनी दिली. टॉवर चौकापासून ते अजिंठा चौफुलीपर्यंतच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात अतिक्रमण झाले असून दररोज सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत असते. या रस्त्यांवर अनेक व्यावसायिकांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. कोणी हात गाड्या, कोणी फर्निचर तर, कोणी विक्रीसाठी आणलेले साहित्य रस्त्यावर ठेवले आहे. त्यामुळे या रस्त्यावर दररोज वाहतूक कोंडी होत असून वाहनधारकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत असतो. सदर अतिक्रमण हटविण्याबाबत वारंवार तक्रारी होत असल्यामुळे महापालिकेचे आयुक्त
ज्ञानेश्वर ढेरे यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाला ते अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले. त्यानुसार सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने चित्रा चौकापासून भंगार बाजारापर्यंतच्या ७० ते ८० अतिक्रमण धारकांवर कारवाई केली. यात ५ टॅक्टर भरून फर्निचर, ३ ट्रॅक्टर भरून इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. यानंतर आज मंगळवारी देखील या रस्त्यावरील उर्वरीत अतिक्रमण काढण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाचे प्रमुख संजय ठाकुर यांनी सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम