
चैत्र पालवी स्वरोत्सवाने नववर्षाला उत्साहपूर्ण सुरुवात
पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
चैत्र पालवी स्वरोत्सवाने नववर्षाला उत्साहपूर्ण सुरुवात
पाडवा पहाटला रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव प्रतिनिधी
गुढी पाडव्याच्या निमित्ताने नवीन मराठी वर्षाची सुरुवात ‘चैत्र पालवी स्वरोत्सव’ या संगीत कार्यक्रमाने उत्साहात झाली. ओवी ते पसायदान या संकल्पनेवर आधारित मराठी गीतांचा हा अनोखा संगम दीपक चांदोरकर यांच्या संकल्पनेतून साकारला. या सांगीतिक सोहळ्याला जळगावकर रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गांधी उद्यान येथे आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर आणि ज्येष्ठ संगीततज्ज्ञ शरदचंद्र छापेकर यांच्या हस्ते गुढीपूजन व दीपप्रज्वलन करून झाले. कार्यक्रमाचे वैशिष्ट्यपूर्ण सूत्रसंचालन प्रीती झारे यांनी केले.
स्वरोत्सवाची सुरुवात ऐश्वर्या परदेसी यांच्या ‘ओम नमो जी आज्ञा वेद प्रतिपाद्या…’ या भक्तिपूर्ण गायनाने झाली. त्यानंतर भूपाळी गीतांचा सुरेल प्रवास रसिकांनी अनुभवला. ‘प्रभाती सुर नभी रंगले…’, ‘मलयागिरीचा चंदन गंधित धूप तुला दावीला…’ यांसह ‘उठी श्रीरामा पहाट झाली पूर्व दिशा उजळली’ या गाण्यांनी वातावरण भारावून गेले. किरण सोहळे यांनी ‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला…’ ही सुप्रसिद्ध भूपाळी सादर करत रसिकांची मने जिंकली.
तसेच, ‘विश्वाचा विश्राम रे स्वामी माझा राम रे..’, ‘पांडुरंग नामे लागलासी ध्यास’ ही भक्तिगीते श्रुती जोशी यांनी सादर केली. यावर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी…’ या गीताने भाषेचा गौरव करण्यात आला. ऐश्वर्या व श्रुती यांनी ‘धन राणी धन राणी साजना…’ हे गाणे पेश केले. भवानी देवीचा गोंधळ तसेच स्व. ना. धो. महानोर लिखित ‘राजसा जवळ जरा बसा..’ ही लावणी ऐश्वर्या परदेशींनी सादर केली.
कार्यक्रमाचा समारोप डॉक्टर अपर्णा भट कासार यांच्या प्रभाकर संगीत अकॅडमीच्या विद्यार्थिनींनी नृत्याविष्कार सादर करून केला. ‘उत्तुंग भरारी घेऊया… मी मराठी मी मराठी…’ तसेच बहिणाबाई चौधरी यांच्या ‘माझी माय सरस्वती माले शिकवते बोली…’ या गीतांवर नृत्य सादर झाले. यावेळी नृत्य कलाकारांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात सहभाग घेतलेल्या कलाकारांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. गायिका श्रुती जोशी, ऐश्वर्या परदेसी, किरण सोहळे यांना विशेष सन्मान देण्यात आला. तसेच वादक राजेंद्र माने (हार्मोनियम), राहुल कासार (तबला), दर्शन गुजराती (पखवाज) यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नुपूर खटावकर-चांदोरकर यांनी केले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम