
चोपडा ओम शांती केंद्रात दिवाळी उत्सव विविध उपक्रमांनी साजरा
चोपडा ओम शांती केंद्रात दिवाळी उत्सव विविध उपक्रमांनी साजरा
ड्रामा, नृत्य, गेम्स आणि सद्भावना संदेशांनी रंगला दिवाळी सोहळा
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा ओम शांती केंद्रात दिवाळीच्या निमित्ताने महालक्ष्मी पूजन, पाडवा व भाऊबीज हे तिन्ही सण अत्यंत भक्तिभावाने व उत्साहात साजरे करण्यात आले. संपूर्ण केंद्र परिसर दिवाळीच्या रोषणाईने आणि आनंदाच्या माहोलने उजळून निघाला होता.
महालक्ष्मी पूजनाच्या दिवशी उत्कृष्ट असा आध्यात्मिक ड्रामा सादर करण्यात आला. या नाट्यप्रयोगात महालक्ष्मीची भूमिका करिष्मा दिदी यांनी प्रभावीपणे साकारली, तर नारदची भूमिका कुणाल सोनार यांनी उत्तमपणे साकारली. ब्रह्माकुमारीजची प्रेरणादायी भूमिका शितल दिदी यांनी सादर केली. या ड्रामामधून शांती, सकारात्मकता आणि आध्यात्मिकतेचा अनमोल संदेश उपस्थितांपर्यंत पोहोचविण्यात आला.
पाडव्याच्या निमित्ताने विविध प्रकारचे आनंददायी खेळांचे आयोजन करण्यात आले. सर्व वयोगटातील सहभागी भावंडांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सणाचा आनंद द्विगुणित केला.भाऊबीजेच्या दिवशी युक्ता पाटील, किंजल पाटील आणि श्रेया पाटील यांनी सादर केलेल्या अप्रतिम नृत्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. या नृत्यांमधून स्नेह, समर्पण आणि सणाची ऊब प्रकट झाली.या विशेष दिवशी केंद्राच्या संचालिका मंगलादीदी यांनी भावपूर्ण शुभेच्छा संदेश देत प्रत्येक भावंडाच्या जीवनात प्रेम, ऐक्य आणि अध्यात्मिक संपदा नांदो अशी सदिच्छा व्यक्त केली. तसेच भावांना गिफ्ट स्वरूपात प्रेमाची निशाणी भेट देण्यात आली.
सदर कार्यक्रमासाठी चोपडा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अॅड. संदीप सुरेश पाटील, स्मिता संदीप पाटील, घनशाम अण्णा पाटील, डॉ. लोकेंद्र महाजन, डॉ. पवन पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगलादीदी, सारिका दिदी, शीतल दिदी, करिश्मा दिदी तसेच ओम शांती केंद्रातील इतर बहिणींनी मोलाचे योगदान दिले. कार्यक्रमानंतर सर्वांसाठी ब्रह्मभोजनाचे आयोजन करून स्नेहसबंध अधिक दृढ करण्यात आला.
दिवाळीच्या या उत्सवातून प्रेम, शांती, आध्यात्मिक एकात्मता आणि आनंदाचा सुंदर संदेश संपूर्ण समाजाला देण्यात आला….

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम