
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक मेळाव्याचे यशस्वी आयोजन
शैक्षणिक आढावा आणि पालकांचे मनोगत
चोपडा तंत्रनिकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक मेळाव्याचे यशस्वी आयोजन
शैक्षणिक आढावा आणि पालकांचे मनोगत
चोपडा: महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचालित श्रीमती शरच्चद्रिका सुरेश पाटील तंत्रनिकेतन महाविद्यालयात आज, दि. २० मार्च २०२५ रोजी पालक-शिक्षक मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्यात महाविद्यालयाचे प्राचार्य व्ही. एन. बोरसे, विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्याच्या प्रारंभी सर्व विभागप्रमुखांनी आपल्या विभागांचा शैक्षणिक आढावा सादर केला. त्यानंतर पालक प्रतिनिधी श्रीमती रेखा ठाकरे आणि श्री अतुल चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत आपले विचार मांडले. त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. काही पालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अधिक सहकार्याची गरज असल्याचे नमूद केले.
प्राचार्यांचे मार्गदर्शन
प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांनी पालकांना संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या शिक्षणात पालकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक विकासावर भर देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले. तसेच, विद्यार्थ्यांना सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्येही सक्रीय सहभाग घ्यावा, असेही ते म्हणाले. महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.
मेळाव्याचे आयोजन आणि सूत्रसंचालन
हा पालक-शिक्षक मेळावा यांत्रिकी विभागाचे वरिष्ठ व्याख्याते श्री पी. व्ही. परब आणि प्राचार्य व्ही. एन. बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागप्रमुख श्री पी. के. चौधरी यांनी केले.
मेळाव्यानंतर सर्व उपस्थितांनी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आणि यशस्वी झाल्याचे सांगितले.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम