चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये “स्तनाचा कर्करोग” जनजागृती अभियान यशस्वीरीत्या संपन्न

बातमी शेअर करा...

चोपडा फार्मसी कॉलेजमध्ये “स्तनाचा कर्करोग” जनजागृती अभियान यशस्वीरीत्या संपन्न

चोपडा – ऑक्टोबर महिना हा “स्तन कर्करोग जनजागृती महिना” म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने श्रीमती शरदचंद्रिका सुरेश पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय, चोपडा येथे “स्तनाचा कर्करोग – जनजागृती अभियान” या विषयावर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

सदर कार्यशाळेस प्रमुख वक्त्या म्हणून सौ. शीला पटोकार (नर्सिंग ऑफिसर, महिला रुग्णालय, जळगाव) उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती वंदना व प्रतिमा पूजनाने झाली.

कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गौतम वडनेरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात महिलांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित केले. “घरातील स्त्री आनंदी आणि निरोगी असेल, तर संपूर्ण कुटुंब आनंदी राहते,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रमुख वक्त्या सौ. पटोकार यांनी स्तनाचा कर्करोग याबाबत सविस्तर माहिती देत त्याची कारणे, लक्षणे, उपाय, उपचार तसेच घरीच त्याचे प्राथमिक निदान कसे करता येईल याबाबत प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की, आजही समाजात कर्करोगाबाबत अनेक गैरसमज आणि भीती आहेत; मात्र योग्य माहिती, लवकर निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास या आजारावर मात करणे शक्य आहे.

ही कार्यशाळा केवळ महाविद्यालयातील विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थिनींनी उत्साहाने सहभाग घेत वक्त्यांना विविध प्रश्न विचारले व मार्गदर्शन घेतले. या कार्यक्रमाला 200 हून अधिक विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष ॲड. भैय्यासाहेब संदीप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील व सचिव डॉ. स्मिता पाटील यांनी अभिनंदन व कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नलिनी मोरे यांनी केले, तर आभार प्रदर्शन डॉ. रुपाली पाटील यांनी केले.

या वेळी डाॅ. स्वर्णलता महाजन, प्रा. आकांक्षा पाटील, प्रा. कांचन पाटील, प्रा. योगिनी सोनवणे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. नलिनी वाघ, सौ. रेखा माळी, सर्व विभागप्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम