
चोपडा बाजार समितीचा राज्यात २३ वा, नाशिक विभागात ६ वा तर जळगाव जिल्ह्यात २ रा क्रमांक
चोपडा बाजार समितीचा राज्यात २३ वा, नाशिक विभागात ६ वा तर जळगाव जिल्ह्यात २ रा क्रमांक
स्मार्ट प्रकल्पांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांमधून उल्लेखनीय स्थान; पारदर्शक कारभार व शेतकरीहिताचा भर
चोपडा विशेष प्रतिनिधी
जागतिक बँक अर्थसहाय्यित माननीय बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (SMART) प्रकल्पाअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधून चोपडा बाजार समितीने उल्लेखनीय यश प्राप्त करत २३ वा क्रमांक पटकावला आहे. यासोबतच नाशिक विभागात ६ वा आणि जळगाव जिल्ह्यात २ रा क्रमांक मिळवणारी चोपडा बाजार समिती ही जिल्ह्यातील एक अग्रगण्य संस्था ठरली आहे.
सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी पणन संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्याकडून बाजार समित्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. या अहवालात चोपडा बाजार समितीने शेतकरी व बाजार घटकांसाठी बाजार आवारात केलेल्या पायाभूत सुविधा, आर्थिक पारदर्शकता, वैधानिक प्रक्रिया आणि एकूण कार्यप्रणाली यामध्ये उच्च दर्जाचे मूल्यांकन प्राप्त केले. त्यानुसार, दिनांक २१ एप्रिल २०२५ रोजी या क्रमवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली.
या यशाचे श्रेय सभापती नरेंद्र वसंतराव पाटील, उपसभापती, सर्व संचालक मंडळ तसेच कर्मचारी वर्ग यांचे संयुक्त नियोजन, कष्ट व समर्पणाला दिले जात आहे. चोपडा बाजार समितीने शेतकरी निवास सुविधा, सेम डे पेमेंट, व्यापारी-हमाल-मापाडींसाठी सुलभ व्यवस्था, तसेच शेतकऱ्यांना न्याय देणाऱ्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे.
या यशाबद्दल सर्व बाजार घटकांतून समाधान व्यक्त होत असून, चोपडा बाजार समितीने भविष्यातही शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्यरत राहण्याची ग्वाही दिली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम