चोपडा व यावल तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवण्याची मागणी

बातमी शेअर करा...

चोपडा व यावल तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवण्याची मागणी

शेतकरी कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

चोपडा (प्रतिनिधी) :चोपडा व यावल तालुका सुरुवातीस दुष्काळग्रस्तांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले होते, मात्र नंतर या दोन्ही तालुक्यांना त्या यादीतून वगळण्यात आले. या अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी दोन वेळा रास्ता रोको आंदोलन करून आपला रोष व्यक्त केला होता. त्याच पार्श्वभूमीवर आज शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी नव्याने रूजू झालेले जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांची भेट घेऊन तालुके पुन्हा दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्याचे निवेदन दिले.

निवेदनात शेतकऱ्यांनी मांडले की, तालुक्यात अतिवृष्टी झाल्यानंतरसुद्धा पावसाचे मोजमाप सकाळी आठ वाजता व नंतरच्या दिवशीच घेतले गेल्याने तांत्रिक बाबींचा आधार घेत शेतकऱ्यांचा घात झाला. तसेच चोपड्याची माती ही रायचिकन (Heavy Black Cotton Soil) असल्याने निचरा न होऊन सततच्या पावसात कापसाची बोंड काळी पडून सरकी सडली, तर इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे चोपडा व यावल तालुका पुन्हा दुष्काळग्रस्त यादीत घेण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, बैठकीत केळीच्या पडत्या भावांबाबत व त्यामागील कारणांवरही सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधून दिले की व्यापाऱ्यांकडून केळी उत्पादकांना लुटले जात असून बाजार समितीचा प्रभावी हस्तक्षेप आवश्यक आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांनी केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी व बाजार समिती प्रतिनिधींची लवकरच संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

या चर्चेदरम्यान जळगावचे आमदार मा. राजुमामा भोळे उपस्थित होते. यांच्यासह एस. बी. पाटील, प्रशांत पाटील, अजित पाटील आदी मान्यवरही उपस्थित होते. .यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम