
चोपड्यात गोमांस वाहतूक प्रकरण; दोघांना पोलिस कोठडी
चोपड्यात गोमांस वाहतूक प्रकरण; दोघांना पोलिस कोठडी
चोपडा – वडती (ता. चोपडा) येथील बोरखेडा–विष्णापूर रस्त्यावर तलाठी कार्यालयासमोरील सार्वजनिक ठिकाणी अवैध गोमांस वाहतूक करताना दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही घटना गुरुवारी (दि. १ ऑगस्ट) रात्री ९ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून, आडावद पोलिसांनी दोघा संशयितांना अटक करून सुमारे २.१० लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात घेण्यात आलेले संशयित कलीम शेख सलीम (वय २५, रा. साने गुरुजी वसाहत, चोपडा) व जावेद शेख सलीम (वय ४५, रा. मोमीन मोहल्ला, चोपडा) हे सार्वजनिक ठिकाणी अंदाजे ५०.४२५ किलो वजनाचे कच्चे गोमांस, किंमत सुमारे १००८० रुपये, तिनचाकी रिक्षा (क्र. MH-19-HF-0926), लोखंडी कुराड व सुरा अशा सामग्रीसह आढळून आले.
संपूर्ण २.१० लाखांचा मुद्देमाल जप्त
सदर रिक्षाची अंदाजे किंमत २ लाख रुपये असून, एकूण जप्त मुद्देमालाची किंमत २,१०,०८० रुपये इतकी आहे. गोवंश कत्तलीसाठी वापरली जाणारी सामग्रीही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याबाबत सरकारी फिर्यादी पोलीस नाईक विनोद धनगर यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ मधुकर पवार हे करीत आहेत.
पोलिस कोठडीत रवानगी
सदर गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या दोघा संशयितांना दि. २ ऑगस्ट रोजी अमळनेर न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती एल. माने यांनी दोन्ही आरोपींना २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
अवैध गोमांस वाहतूक आणि कत्तलीप्रकरणी प्रचलित कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम