चोपड्यात वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ अंतिम टप्प्यात

बातमी शेअर करा...

चोपड्यात वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ अंतिम टप्प्यात

२८ डिसेंबरला सेमी-फायनल व रात्री रंगणार फायनल; क्रिकेटप्रेमींना उपस्थितीचे आवाहन
चोपडा प्रतिनिधी : चोपडा शहरात सुरू असलेल्या पाच दिवसीय वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, रविवार दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी या स्पर्धेचे सेमी-फायनल आणि अंतिम सामना खेळवला जाणार आहे. दुपारी सेमी-फायनल सामने होणार असून, रात्री अंतिम सामन्याने या भव्य क्रिकेट महोत्सवाचा थरारक समारोप होणार आहे. या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातील क्रिकेटप्रेमींनी चोपडा येथील गोरगावले रोडवरील मैदानावर उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
२४ डिसेंबर २०२५ रोजी सुरू झालेली वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ ही पाच दिवसीय स्पर्धा असून, २८ डिसेंबर रोजी अंतिम दिवशी पोहोचली आहे. चोपडा येथे आयोजित या स्पर्धेत राजस्थान, गुजरात, मुंबई तसेच इतर जिल्ह्यांतील नामवंत व होतकरू खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. बाहेरून आलेल्या खेळाडूंसाठी समर्थ पार्क येथे निवास व भोजनाची उत्तम व्यवस्था आयोजकांनी केली आहे.
स्पर्धेच्या चौथ्या दिवशी झालेल्या सामन्यात वैदिक ऋषी कॉम्प्युटर संघाने विजय मिळविला. या सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल नचिकेत चौधरी यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार पोलीस किरण पाटील व विनायक पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
वीर गुजर क्रिकेट लीग पर्व २ मध्ये प्रत्येक सामन्यात विजयी संघातील उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाजांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येत असून, उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना बक्षिसांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे स्पर्धेत खेळाडूंमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, रविवार २८ डिसेंबर रोजी होणाऱ्या सेमी-फायनल व अंतिम सामन्यांच्या पार्श्वभूमीवर चोपड्यात क्रिकेटप्रेमींची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या भव्य क्रिकेट सोहळ्याचा समारोप पाहण्यासाठी सर्व क्रिकेट रसिकांनी गोरगावले रोडवरील मैदानावर आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे पुन्हा करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम