
चोपड्यात हरणाची शिकार उघडकीस ; मध्य प्रदेशातील दोघे अटकेत, मांस व शिंगे जप्त
चोपड्यात हरणाची शिकार उघडकीस ; मध्य प्रदेशातील दोघे अटकेत, मांस व शिंगे जप्त
जळगाव (प्रतिनिधी) – चोपडा तालुक्यातील वैजापूर परिसरात हरणाची शिकार करून त्याचे मांस व शिंगे विक्रीसाठी आणणाऱ्या मध्य प्रदेशातील दोघा तस्करांना ग्रामीण पोलिस व वन विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली. त्यांच्याकडून हरणाचे ताजे मांस आणि दोन शिंगे जप्त करण्यात आली असून, या प्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले दोघे आरोपी वांगऱ्या बारेला (वय ४८) आणि धुरसिंग बारेला (वय ४५, दोघेही रा. वरला, जि. बडवानी, मध्य प्रदेश) हे वैजापूर परिसरात हरणाचे मांस विक्रीसाठी येणार असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी राकेश पाटील व गजानन पाटील यांना मिळाली होती. याबाबत तात्काळ वन विभागासही माहिती कळविण्यात आली.
त्यानुसार बोरअजंटी–वैजापूर रस्त्यावर नाकाबंदी करण्यात आली. पोलीस निरीक्षक अनिल भवारी, सहायक फौजदार राजू महाजन, हवालदार राकेश पाटील, गजानन पाटील, विनोद पवार, चेतन महाजन, सुनिल कोळी तसेच वन विभागाचे अधिकारी विकेश ठाकरे, वनपाल सारिका कदम, वनरक्षक बी. आर. बारेला, बानू बारेला आणि योगेश सोनवणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दुचाकीवरून जात असलेले वांगऱ्या व धुरसिंग यांना थांबवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्या सामानात हरणाचे ताजे मांस व दोन शिंगे आढळून आली. पोलिसांनी ताबडतोब कारवाई करत दोघांना अटक केली व मुद्देमाल जप्त करून चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात आणले.
दरम्यान, मे महिन्यातही अशाच प्रकारे अवैधरित्या हरणांची शिकार व तस्करी करणारी टोळी चाळीसगाव वन परिक्षेत्र अधिकारी शीतल नगराळे यांच्या नेतृत्वाखाली पकडण्यात आली होती. सातपुडा पर्वत रांगांतील जंगलात हरणांची शिकार करून त्यांचे मांस, कातडी व शिंगे यांची तस्करी सर्रास केली जात असल्याचे वन विभागाच्या तपासात उघड झाले आहे.
तस्कर जंगलातील गुप्त पायवाटांचा वापर करून वन विभागाच्या नजरेतून बचाव करत असल्याने त्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवणे हे पोलिस आणि वन विभागासमोरील मोठे आव्हान ठरत आहे. वन्य प्राण्यांची शिकार व अवयवांची तस्करी करणाऱ्यांविरोधात कडक कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते, मात्र अशा गुन्ह्यांमध्ये गुंतलेले आरोपी कायद्यालाही भीक घालत नसल्याचे वास्तव समोर येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम