
चोरलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत जप्त; दोन चोरटे अटकेत
चोरलेली मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत जप्त; दोन चोरटे अटकेत
पारोळा पोलिसांची यशस्वी कारवाई
पारोळा, (प्रतिनिधी) कोळपिंपरी (ता. पारोळा) येथील रहिवासी ज्ञानेश्वर मच्छिंद्र कोळी यांच्या घरासमोरून चोरीस गेलेली हिरो कंपनीची ३५ हजार रुपये किमतीची मोटारसायकल अवघ्या काही दिवसांत पारोळा पोलिसांनी शोधून काढत दोन चोरट्यांना अटक केली. ही कारवाई तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली असून, पोलीस विभागाच्या दक्षतेचे यामध्ये विशेष कौतुक होत आहे.
दि. २१ जुलै २०२५ रोजी रात्री ११ वाजेनंतर MH 54 A 2195 क्रमांकाची मोटारसायकल ज्ञानेश्वर कोळी यांच्या घरासमोरून चोरीस गेली होती. त्यांनी पारोळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यानंतर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार सुनील हटकर यांच्याकडे सोपवण्यात आला.
तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे चोरटे गजाआड
प्रभारी अधिकारी सचिन सानप यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोळपिंपरीतील अभय प्रवीण पाटील आणि त्याचा साथीदार मयूर तुळशीदास देवरे (रा. खडकी, ता. मालेगाव) यांच्यावर संशय घेत तपास सुरू करण्यात आला. पोलीस हवालदार सुनील हटकर, प्रवीण पाटील आणि पोलीस अंमलदार अनिल राठोड यांच्या पथकाने अमळनेर शहरात सापळा लावून अभय पाटीलला अटक केली.
तांत्रिक विश्लेषणाद्वारे त्याचा मोबाईल क्रमांक ट्रॅक करून ठिकाण निश्चित करण्यात आले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली आणि मोटारसायकल मयूर देवरेकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी मालेगावमध्ये कारवाई करून मयूर देवरेलाही अटक केली आणि त्याच्याकडून चोरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
प्रशंसनीय पोलिसी कामगिरी
या संपूर्ण कारवाईचे जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, पारोळा पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या नेतृत्वाखाली संचालन झाले. पो.ह. सुनील हटकर, प्रवीण पाटील, महेश पाटील व पो.अं. अनिल राठोड यांच्या समन्वयाने ही यशस्वी कारवाई पार पडली.
ही कामगिरी उघडकीस आल्यामुळे पारोळा पोलीस ठाण्याचे सर्वत्र कौतुक होत असून, पोलिसांच्या दक्षतेमुळे नागरिकांमध्ये विश्वासाची भावना अधिक दृढ झाली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम